

संजीव कुळकर्णी
नांदेड ः महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जनतेने नाकारले; पण पक्षाने तारले’ असे अनेकांच्या बाबतीत झाले आहे. काहींना तर दोन्ही घटकांनी वाळीत टाकल्याची उदाहरणे आहेत; पण नांदेडलगतच्या हिंगोली जिल्ह्यातील रामराव वडकुते हे मात्र पुन्हा भाग्यवान ठरले असून भाजपाने राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित करून त्यांना राजकीयदृष्ट्या तारले आहे!
राज्यसभेच्या दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत डॉ.अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देऊन पक्षनेतृत्वाने नांदेड जिल्ह्याला सुखद धक्का दिला, तर आता नांदेडच्या सीमेवरील हिंगोली जिल्ह्याला वडकुते यांच्या रूपाने संधी देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र राहिलेले भारतरत्न दिवंगत नानाजी देशमुख हे मागील काळात राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त केले गेले होते. त्यानंतर या जिह्यातून भाजपाकडून राज्यसभेवर जाणारे वडकुते हे पहिलेवहिले नेते ठरले असून त्यांच्या या नियुक्तीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अनुयायांना भाजपाच्या गोटातून बुधवारी सकाळी मोठ्या आनंदाची बातमी मिळाली.
खा.शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर या पक्षाला ओबीसी प्रवर्गातून जे धडपडणारे कार्यकर्ते लाभले, त्यात रामराव वडकुते हे एक होते. या पक्षामध्ये ते माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे समर्थक म्हणून पुढे आले. या पक्षाने त्यांना 2004 साली कळमनुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली; पण या पहिल्या निवडणुकीमध्ये वडकुते यांचा पराभव झाला. असे असले, तरी धनगर-हटकर समाजातील त्यांचे स्थान विचारात घेऊन पक्षाने त्यांना वेगळ्या जबाबदारीत गुंतविले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे वडकुते यांना राज्यभर काम करण्याचा वाव मिळाला, तरी त्यांना स्वतःसाठी हक्काचा मतदारसंघ निर्माण करता आला नाही.
2009 साली त्यांची संधी राजीव सातव यांच्यामुळे हुकली होती; पण ‘राष्ट्रवादी’ने त्यांना 2014मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. तेव्हा या जागेसाठी सूर्यकांता पाटील यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत असताना, शेवटच्या क्षणी वडकुते यांचे नाव जाहीर झाल्यामुळे सूर्यकांता पाटील यांची व त्यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. नंतर श्रीमती पाटील यांनी पवारांवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
वडकुते आमदार झाले; पण नंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्यांना विरोधी आमदार म्हणून काम करावे लागले. 5 वर्षे राष्ट्रवादीची आमदारकी भूषविल्यानंतर त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. मागील पाच वर्षांत त्यांनी हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या तरी विधान परिषद किंवा राज्यसभेवरील प्रतिनिधित्वासाठी त्यांचे नाव कोणत्याही माध्यमातून कधी समोर आल्याचे दिसले नाही.
आता होणाऱ्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाकडून काही संभाव्य नावांची चर्चा जोरात झाली. त्यात प्रमुख नेत्यांचाही समावेश होता. संभाजीनगरच्या विजया रहाटकर, विद्यमान खासदार डॉ.भागवत कराड, माजी मंत्री रावसाहेब दानवे इत्यादींची नावे गेल्या काही दिवसांत समोर आली; पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.कराड यांना निवृत्तीचे श्रीफळ देत मराठवाड्यातून वडकुते यांचे नाव उचलून धरत सर्वांनाच धक्का दिला. खुद्द वडकुते यांनी आपल्याला राज्यसभेची अपेक्षा नव्हती असे सांगितले, त्यातच सारे काही आले.
मागील शतकाच्या उत्तरार्धामध्ये काँग्रेस पक्षातर्फे नांदेडमधून शंकरराव चव्हाण, सूर्यकांता पाटील व विठ्ठलराव जाधव हेे तीन नेते एका कालखंडात राज्यसभेमध्ये होते. त्यानंतर नांदेड-हिंगोली या दोन जिल्ह्यांतून भाजपातर्फे राज्यसभेमध्ये तिघेजण विराजमान झाल्याचे दिसणार आहे. राष्ट्रवादीच्या परभणी येथील फौजिया खान निवृत्त होत असताना वडकुते यांचा राज्यसभेमध्ये प्रवेश होणार आहे.