

Parbhani Hingoli Cooperative Sector Development
सेलू : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रथमच भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची सर्व संचालकांच्या एकमताने बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्र अधिक सक्षम आणि बळकट करण्याची ग्वाही दिली.
मुंबई येथे ५ ऑगस्ट रोजी झालेल्या या भेटीदरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे तसेच संचालक दत्तराव मायंदळे, रामभाऊ आरगडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी वर्गासाठी महत्त्वाच्या आर्थिक संस्था असल्याचे सांगितले. सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, प्रदेश सहकार आघाडीचे संयोजक म्हणून मिळालेली जबाबदारी त्यांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यशस्वीपणे पार पाडली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कायम सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याच्या संकल्पनेचा उल्लेख करत, सहकार चळवळीच्या विस्तारासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.