

All India Buddhist Dhamma Conference
पूर्णा : जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महामानव होऊन गेला नाही. त्यांच्या विचारांना व कार्याला वंदन करणारे कोट्यवधी अनुयायी आहेत; मात्र त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले.
ते पूर्णा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत बोलत होते.
मंत्री शिरसाठ म्हणाले की, ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादनासाठी गेलो असता, लाखो लोकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांवरील असंख्य पुस्तके लोक मोठ्या प्रमाणावर विकत घेत असल्याचे दिसले. डॉ. आंबेडकर ही आमची अस्मिता आहे. ज्या ठिकाणी त्यांचा अवमान होतो, तेथे आंबेडकरी समाज पद, प्रतिष्ठा वा नोकरीची पर्वा करत नाही.
ते पुढे म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे नाव का घेतले जात नाही, असा सवाल उपस्थित होतो. माझे आजोबा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक बुद्ध धम्म दीक्षा सोहळ्यास उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आम्ही तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे आहोत.
डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उत्थानासाठी शासनातर्फे ५०० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, कारण आम्हाला बाबासाहेबांचा शिक्षणविषयक विचार जिवंत ठेवायचा आहे. तरुणांनी केवळ साध्या नोकऱ्यांपुरते मर्यादित न राहता उच्च पदस्थ अधिकारी व्हावे, उद्योग-व्यवसायात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.
“गाव तिथे बुद्ध विहार असले पाहिजे. त्या ठिकाणी शासनाकडून निधी देण्यासाठी मी तयार आहे. बुद्ध विहारालगत ग्रंथालय, वाचनालय व अभ्यासिकेची सुविधाही असली पाहिजे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करेन,” असेही ना. शिरसाठ यांनी स्पष्ट केले. तसेच बुद्ध विहार ते डॉ. आंबेडकर नगर (सिद्धार्थ नगर) जोडणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी प्रस्ताव सादर करा; हा जिव्हाळ्याचा प्रश्न निश्चित सोडवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य मार्गदर्शक पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या धम्मकार्याविषयी गौरवोद्गार काढण्यात आले. धम्मपरिषद आधारित स्मरणिकेचे विमोचन ना. शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला दक्षिण कोरिया येथील पूज्य भंते युम जेयुंग हो, बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे व्हॉइस चान्सलर डॉ. ली ची रेन, तसेच सुप्रसिद्ध महिला उद्योगपती श्रीमती एन. नागिम व श्रीमती किम डोंग गीव यांची उपस्थिती होती. दक्षिण कोरिया व भारतीय भिक्खू संघाचे समन्वयक डॉ. नितीन साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
दक्षिण कोरियातील पूज्य भंते वोमांग यांनी, “भारतामध्ये बुद्ध धम्माचे पुनर्जीवन मोठ्या जोमाने होत आहे, हे पाहून आनंद वाटतो. भारत ही बुद्धाची भूमी असून आम्हाला या भूमीबद्दल नितांत आदर आहे,” असे गौरवोद्गार काढले. बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे माजी व्हॉइस चान्सलर डॉ. ली ची रेन यांनी डॉ. आंबेडकरांच्या धम्मजागृती, सामाजिक समतेसाठी दिलेल्या लढ्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी परिषद आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी दक्षिण कोरिया व भारतीय भिक्खू संघाच्या हस्ते स्मृतीशेष पूज्य भंते यांच्या चैत्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
परिषदेचे सूत्रसंचालन भदंत पयानंद व भदंत धम्मशील यांनी केले. परिषद यशस्वी केल्याबद्दल संयोजक भदंत पया वंश यांचा दक्षिण कोरिया येथील पूज्य भंतेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पूर्णा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विमलबाई कदम, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड, सेवानिवृत्त सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, बुद्ध विहार समितीचे सचिव अॅड. महेंद्र गायकवाड, माजी नगराध्यक्ष विशाल कदम, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, नगरसेवक अनिल खराटे, अॅड. धम्मदीप जोंधळे, सुनील जाधव, गौतम भोळे, रऊफ कुरेशी, मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. केशव जोंधळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
परिषद यशस्वी करण्यासाठी बुद्ध विहार समिती, धम्मसेवेत कार्यरत महिला मंडळ, समता सैनिक दल, स्काऊट-गाईड आदींनी विशेष परिश्रम घेतले.