

Purna Avhai robbery
पूर्णा : तालुक्यातील आव्हई येथे दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या घरातून रोख १ लाख रुपये आणि ७१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आव्हई येथील शेतकरी गोपाळ ग्यानोजी बुचाले (वय ३०) हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडिलांना शेतात सोडून घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या लहान मुलीची तब्येत बिघडल्याने ते पत्नीसमवेत सकाळी ११ वाजता वसमत येथे रुग्णालयात गेले.
दुपारी सुमारे ३.३० वाजता ते घरी परतले असता घराच्या आतील दरवाजाला कुलूप व कडीस लटकलेले आढळले. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता, कपाटे फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तपासणी केली असता कपाटातील ५०० रुपयांच्या २०० नोटा (एक लाख रुपये) आणि १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (सुमारे ७१ हजार रुपये किंमत) असा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी बुचाले यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सपोनि सोमनाथ शिंदे हे पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान, ही चोरी दिवसा ढवळ्या घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.