

Purna Municipal Wall Demolition
पूर्णा : शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने नालंदा नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची संरक्षक भिंत व सुरक्षा गेट पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, बांधकामासाठी आवश्यक पाणी व वीज अधिकृतपणे उपलब्ध करून न घेता, परस्पर सभागृहाच्या बोअरवेल व वीजपुरवठ्यावर डल्ला मारल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम करणारी ही यंत्रणा सुरुवातीपासूनच विविध गैरप्रकारांमुळे वादात सापडली आहे. वीजेची चोरी करण्यासाठी तारेवर आकडे टाकणे, पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू होणे, अशा गंभीर घटना घडूनही संबंधित कंत्राटदारावर अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कंत्राटदाराची मनमानी अधिकच वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ताज्या प्रकारात नालंदा नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी प्रभागातील नगरसेवक सुनील जाधव यांच्याकडे तक्रार नोंदवली. जाधव यांनी तत्काळ सभागृहाला भेट देऊन संबंधित कंत्राटदारास येथील पाणी व वीज वापरणे तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या. तसेच बांधकामासाठी स्वतंत्र पाणी व वीज व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले. तोडफोड करण्यात आलेल्या संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृष गुट्टे यांना माहिती देत तातडीने कारवाईची मागणी केली.
मात्र, या सूचनांनंतरही संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.