Parbhani Bribe Case : गंगाखेड येथे ३ हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

Parbhani Bribe Case : गंगाखेड येथे ३ हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

परभणी, पुढारी वृत्तसेवा: राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत रोटावेटरसाठी निवड झालेल्या शेतकर्‍यांकडून अनुदानाच्या रक्कमेतून तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्षकाला रंगहाथ अटक करण्यात आली. गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मोहन सुरेशराव देशमुख (रा.गणेश नगर, अहमदपूर) असे अटक केलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.12) केली. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. Parbhani Bribe Case

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील एका शेतकर्‍याचे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत रोटावेटरसाठी ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झाली होती. हे यंत्र खरेदीसाठी त्यांना गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पूर्व संमती पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते रोटावेटर खरेदी केले. त्याची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख याने दि.21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या गावास भेट देवून रोटावेटरचे फोटो काढले. त्याचवेळी त्यांनी शेतकर्‍यास तुम्ही येवून भेटला नाहीत, असे नमूद करीत हे फोटो अपलोड करण्यासाठी आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यावर टाकण्यासाठी पैशाची मागणी केली. Parbhani Bribe Case

या मागणीनंतर शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर 5 मार्चरोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान मोहन देशमुख याने 3 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मंगळवारी पथकाने सापळा रचून मोहन देशमुख यास लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, हवालदार निलपत्रेवार, नागरगोजे, जिब्राईल शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा 

Back to top button