परभणी : पुढारी वृत्तसेवा : महायुती व महाविकास आघाडीकडे माढा व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. परंतू ही मागणी मान्य न झाल्यास आपण स्वतः रासपच्या तिकीटावर परभणीतून निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी (दि. 11) येथे केली.
रासपच्या वतीने परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी जानकर यांनी रासपची भूमिका स्पष्टपणे मांडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अक्की सागर होते. आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवटे, कुमार सुशिल, विलास गाडवे, सचिन देशमुख, फारूख बाबा, विष्णू सायगुंडे आदींची उपस्थिती होती.
जानकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना भाजपवर कडाडून टिका केली. आपण भाजपच्या जवळ राहिलो. मात्र, त्या पक्षाने मित्रपक्ष म्हणून नेहमीच दडपशाहीचे तंत्र अवलंबीले. कोणत्याही भूमिका घेताना मित्रपक्ष म्हणून सोबत घेतले नाही. परभणीत आ. रत्नाकर गुट्टे हे पक्षाचे एकमेव आमदार निवडून आले. मात्र भाजपने नेहमीच रासपला धोका दिला आहे, असा आरोप करताना आपणही यापुढे निश्चित भूमिका घेणार आहोत. त्या दृष्टीने लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या संपर्कात आहोत. रासपला योग्य भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असेही जानकर म्हणाले.
यावेळी आ. गुट्टे म्हणाले, महायुतीसोबत राहण्याची तयारी आहे, परंतू त्यासाठी लोकसभेची परभणीची जागा ही अट आहे. या मतदारसंघात रासपची मोठी ताकद असून, जानकरांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.