परभणी: गंगाखेडच्या चिन्मयी बोरफळेची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदी निवड | पुढारी

परभणी: गंगाखेडच्या चिन्मयी बोरफळेची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदी निवड

 गंगाखेड पुढारी वृत्तसेवा : कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अथवा क्रिकेटच्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध नसताना शहरातील चिन्मयी प्रसाद बोरफळे या युवा अष्टपैलू क्रिकेटपटूने थेट महाराष्ट्र राज्य एकदिवसीय क्रिकेट संघाच्या (अंडर- १९) उप कर्णधार पदापर्यंत मजल मारली. ५ वर्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने युवा क्रिकेटपटू चिन्मयीच्या कष्टाचे चीज झाले आहे. शहरासह परभणी जिल्ह्यातून चिन्मयीच्या यशाचे कौतुक होत आहे.

महाविद्यालयीन वयात आवड असल्यामुळे क्रिकेटची बॅट हाती धरलेल्या शहरातील चिन्मयी बोरफळेंने महाराष्ट्र राज्याच्या महिला क्रिकेट संघात (अंडर-१९) उपकर्णधार पद पटकाविले आहे. मागील ५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघासाठी (अंडर-१९) तिचे सातत्यपूर्ण योगदान यासाठी कामी आले आहे. चिन्मयी सध्या पुणे येथील ॲचिव्हर क्रिकेट अकादमी मध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.

रविवारी (दि.८) ऑक्टोबरपासून सुरत (गुजरात) येथे होत असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा (अंडर-१९) साठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये कर्णधारपदी खुशी मौला हीची तर उप कर्णधारपदी चिन्मयी बोरफळे हिची निवड करण्यात आली आहे. संघात सौम्यलता बिराजदार, गायत्री सुरवसे, आचल अग्रवाल, अदिती वाघमारे, श्रुती महाबळेश्वरकर, यशोदा घोगरे, मयुरी थोरात, ईश्वरी अवसरे, समृद्धी दळे, ज्ञानदा निकम, ईशा घुले, भाविका अहिरे, श्रद्धा गिरमे यांची वर्णी लागली आहे. परभणी जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष संतोष बोबडे, सुहास पापडे यांच्यासह गंगाखेड शहरासह परभणी जिल्ह्यातील तमाम क्रिकेट प्रेमींनी चिन्मयी बोरफळे हिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button