

परभणी, पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी खरीपात झालेल्या नुकसानीचे अनुदान आधी वाटप करा, त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हजेरी लावावी. अनुदान न दिल्यास मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या अनुषंगाने मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सातत्याच्या पावसामुळे खरीपामध्ये अनेक मंडळांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने या नुकसानीबाबत मदतीची घोषणाही केली होती. त्यानंतर शासनाकडून आलेली मदत ही तुटपुंजी स्वरूपाचीच राहिली. जिल्ह्यातील 5 तालुक्यांसाठी 70 कोटी 37 लाखांची रक्कम मदत स्वरूपात देत ती वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. परंतु, या प्रकारामुळे परभणी, जिंतूर, गंगाखेड व सोनपेठ या चार तालुक्यातील शेतकर्यांना वगळले गेले आहे. त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 5 तालुक्यांना नुकसान भरपाई मात्र 4 तालुके पुर्णपणे नुकसान भरपाईपासून दूर राहिले गेले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकर्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेवून राज्य शासनाने या चार तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने दि.12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील अनेक सदस्य जिल्ह्यात दाखल होणार आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा प्रशासनाला या नुकसान भरपाईबाबतचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोढे, हनुमान आम्ले, सुधाकर खटींग, माऊली शिंदे, निवृत्ती गरूड, रामभाऊ आवरगंड, उद्धव जवंजाळ, अनंतराव देशमुख, विलास आव्हाड, किशोर देशमुख, सुरेश रासवे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांसह मंत्री मंडळातील सदस्य राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर शासन आपल्या दारी हा उपक्रम होणार असून यासाठी प्रशासन जोमाने कामास लागले आहे. मात्र, शेतकर्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधी मदत द्या, नंतरच जिल्ह्यात दाखल व्हा, अशी आक्रमक भूमिका घेताना कार्यक्रम होवू देणार नसल्याचाही इशारा दिला आहे.
हेही वाचा