परभणी : पाथरीत रोडरोमियोंच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांची खाजगी शिक्षकांसोबत बैठक | पुढारी

परभणी : पाथरीत रोडरोमियोंच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांची खाजगी शिक्षकांसोबत बैठक

पाथरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी क्लासेस या ठिकाणी रोडरोमियोंकडून मुलींच्या छेडाछेडीच्या घटना घडत आहेत. या रोडरोमियोंच्या बदोबस्ताचा प्लॅन पाथरी पोलिसांच्या वतीने आखण्यात आला असून या अनुषंगाने आज गुरुवारी (दि.३) शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस चालक शिक्षकांची पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षकांनी क्लासेस चालकांना सुरक्षा उपायोजना अमंलबजावणी संदर्भात कडक सुचना केल्या.

पाथरी शहरात मागील काही दिवसांपासून शालेय विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.यामुळे मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संवेदनशील प्रश्नी मागील आठवड्यापासून व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघटना, स्थानिक पालक व नागरिक, वाहन चालक संघटना यांनी रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदने दिली होती. माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले होते. पाथरी पोलिसांनी याची दखल घेत शालेय विद्यार्थिनी व मुलींच्या सुरक्षतेसाठी पाऊल उचलली आहेत. शहरातील शाळा महाविद्यालय व खाजगी शिकवणी वर्ग परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवली आहे .

याप्रकरणी पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांनी गुरुवारी पाथरी शहरातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची ‘विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरक्षितता ‘ या विषयावर बैठक घेतली. या बैठकीला खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांसह कंप्यूटर इन्स्टिट्यूट चे चालक अशा २२ जण उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुकाळे यांनी खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या कोचिंग सेंटर बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, विद्यार्थ्यांना क्लासेसचे ओळखपत्र देणे, क्लासेसचा ड्रेस कोड ठेवणे , विद्यार्थ्यांच्या क्लासेसमध्ये जाण्या- येण्याच्या वेळेची नोंद ठेवणे यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान पोलीस आणि खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे चालक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. यामध्ये दामिनी पथकांचे पोलीस अधिकारी व ठाण्यातील आमंलदार असणार आहेत. त्यामुळे या परिसरातील घटना घडामोडींविषयी तात्काळ माहिती पोलिसांना मिळणार आहे. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी बंदोबस्त केला जाणार असून रोडरोमियोंची गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 हेही वाचलंत का ? 

 

Back to top button