परभणी: महादेव जानकर- रत्नाकर गुट्टे गळाभेट; राजकीय चर्चांना पूर्णविराम | पुढारी

परभणी: महादेव जानकर- रत्नाकर गुट्टे गळाभेट; राजकीय चर्चांना पूर्णविराम

गंगाखेड पुढारी वृत्तसेवा : आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे निष्ठावंत लोकप्रतिनिधी आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा वेगळा राजकीय अर्थ घेण्याची गरज नसून आमदार गुट्टे हे रासपाचे होते, आहेत व राहणार असा विश्वास व्यक्त करत जानकरांनी आ.गुट्टे यांची गळाभेट घेत होऊ घातलेल्या चर्चांना केवळ पूर्णविरामच दिला. आणि आजचे आमदार गुट्टे हे उद्या रासपचेच मंत्री असतील अशी घोषणाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शनिवारी (दि.५) गंगाखेड येथे केली.

रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे जनस्वराज्य यात्रा शनिवारी (दि.५) गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पोहोचली. रासपाचे राज्यातील एकमेव आमदार या नात्याने रत्नाकर गुट्टे यांनी यात्रेचे शहरात जोरदार स्वागत केले. याप्रसंगी आमदार गुट्टे यांचे सह माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, युवा उद्योजक सुनील गुट्टे, आ.गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे आदींची यावेळी उपस्थित होते.

शहरातील नांदेड रोडवरील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद मुरकुटे यांच्या निवासस्थानासमोर आमदार गुट्टे व सुमारे १ हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य रॅलीचे जोरदार व उत्स्फूर्त स्वागत केले. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात रासपचे अध्यक्ष जानकर यांची सभा झाली.

याप्रसंगी बोलताना आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की, यावर्षीची विधानसभेची निवडणूक मी जेलमधून जिंकलो. याचे श्रेय येथील मतदारां एवढेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आहे. मंत्री पदावर असूनही केवळ सर्वसामान्यांसारखा माझा अहोरात्र परिश्रम घेऊन प्रचार केल्यानेच मी विजयी झाल्याची मला जाण आहे. या उपकाराशी मी कृतघ्न होण्याचा प्रश्नच येत नाही.

मी प्रत्येक निवडणूक ही रासपच्या चिन्हावरच लढविली असून आगामी काळातही मी रासपाचाच उमेदवार असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे दोघेही आपले नेते असून दोघांनी एकत्र बसून घेतलेला राजकीय निर्णय मला मान्य असेल असे ग्वाही देत यापुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आमदारकी रासपच्याच चिन्हावर आपण लढविणार असून परभणी जिल्हा राजकीय दृष्ट्या काबीज करण्यासाठी पूर्ण ताकतीनीशी मी लढणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जानकर यांना दिली.

यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, रत्नाकर गुट्टे हे माझे भाऊ आहेत. ते माझ्याशी राजकीय अविश्वास कधीच करू शकत नाहीत. त्यांच्या विजयानेच माझ्या पक्षाचे महत्त्वही विधिमंडळात वाढले असून आज ते रासपचे आमदार आहेत. उद्याचे ते रासपचे मंत्री असतील. भाजपशी माझे कुठलेही राजकीय वैर असून नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यापुढे मी न जाता गंगाखेडच्या विधानसभेसह राज्यात रासपचे १२ आमदार होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

हेही वाचा;

Back to top button