उस्मानाबाद : तेरखेडा येथील सुतळी ॲटमबॉम्बला राज्यासह परराज्यात मागणी

उस्मानाबाद : तेरखेडा येथील सुतळी ॲटमबॉम्बला राज्यासह परराज्यात मागणी

रत्नापूर; बाळासाहेब जाधवर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा फटाकानगरी मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळखली जाते.  महाराष्ट्रातच नाही. तर परराज्यातही येथील सुतळी ॲटमबॉम्बला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 'दिवाळी सण मोठा तिथे वाजला पाहिजे तोटा' अशी म्हण आहे. दिवाळी सणांमध्ये तोटे, फटाके वाजवणे ही परंपरा आहे. त्यातच तेरखेडा गावातील फटाका महाराष्ट्रासह  परराज्यात प्रसिद्ध आहे. दिवाळी ८ दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर येथील फटाके व्यापाऱ्यामध्ये फटाके खरेदी- विक्रीची लगबग सुरू झाली आहे.

गेली दोन वर्ष कोरोना महामारीत दिवाळी सण गेल्याने सण साजरा न करता केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचे काम देशातील जनता करत होती. सध्या कोरोना पूर्णपणे संपला असल्यामुळे यंदाची दिवाळी ही फटाक्यांची दिवाळी होणार असल्याने मराठवाड्याची शिवकाशी तेरखेडा नगरी सज्ज झाली आहे. फटाक्यांचे माहेरघर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याने सध्या या ठिकाणी फटाका खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येताना दिसत आहेत.

गावात पूर्वीपेक्षा सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने थाटली गेली आहेत. तेरखेडा ॲटमबॉम्ब, सुतळी ॲटम बॉम्ब, भुरनुळे, फॅन्सी तोटे, फटाकड्या, आवाजाचे फुलबाजी, भुरनाळे याची मागणी परराज्यात वाढत आहे. पर राज्यातील व्यापारी खरेदीसाठी येथे गर्दी करीत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोना महामारी असल्याने फटाके व्यवसायाला मंदी आली होती. परंतु यावर्षी मात्र कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात दरही वाढले आहेत. तरीही नागरिकांचा प्रतिसाद मोठा आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या ठिकाणाहून मागणी वाढत आहे.

फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका असोसिएशन

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news