

अनिल तावरे
सांगवी : एकीकडे राज्य सरकार पटाअभावी राज्यातील शाळा बंद करत आहे, दुसरीकडे सांगवी (ता. बारामती) येथे इयत्ता पहिली ते 7 वी पर्यंत भरणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जीर्ण झालेल्या वर्गांमध्ये साप आढळून येऊ लागले आहेत. परिणामी विद्यार्थी भयभीत झाले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि राज्यकत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे हा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जुन्या 14 खोल्या आहेत. कालबाह्य खोल्या झाल्याने 2013 मध्ये नवीन 12 खोल्या बांधल्या. सध्या शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा चांगला असल्याने एकूण पट 523 इतका आहे, परंतु नवीन खोल्या अपुर्या पडत असून पाच वर्ग जुन्या कालबाह्य शाळेतच भरत आहेत. शासकीय नियमानुसार या जुन्या कालबाह्य खोल्या वापरण्याची परवानगी नाही, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे कोठे या प्रश्नामुळे शाळा प्रशासनाला व ग्रामपंचायतीने जुन्याच पाच खोल्यांची किरकोळ डागडुजी करून वर्ग भरवत आहेत. कालबाह्य खोल्यांचे दगडी बांधकाम ठिसूळ झाले आहे. भिंतींना भोके पडली आहेत.
मागील आठवड्यात सहावीच्या वर्गात भला मोठा साप आढळून आला होता. सुदैवाने मुले मधल्या सुटीत वर्गाबाहेर गेली होती, त्यामुळे अनर्थ टळला होता. जीर्ण वर्गातील विद्यार्थी व शिक्षक नेहमीच भयभीत झालेल्या अवस्थेत असतात. शाळेची अवस्था दयनीय झालेली असतानाच शाळेच्या प्रांगणात पावसाळ्यात साचणारी पाण्याची डबकी, मागील बाजूला गवतांचे जंगल यांमुळे विंचू-काटा वाढण्यास वाव मिळत आहे. मात्र, कोणीच याची दखल घेताना दिसत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर 2013 साली नवीन वर्ग खोल्यांचे उद्घाटन झाले होते, तेव्हापासून आजतागायत कालबाह्य खोल्या पाडण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सांगवी गावच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, परंतु चिमुकल्यांवर गटातटाच्या कुरघोड्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजितदादा आमच्या मुलांना वाचवा, अशी आर्त हाक पालकांनी दिली आहे.
कालबाह्य, जीर्ण, धोकादायक खोल्या पाडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविला आहे.
– छाया गायकवाड, मुख्याध्यापिकासांगवीतील जुन्या धोकादायक खोल्या पाडण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– अजय गावडे, कनिष्ठ अभियंता, शिक्षण विभाग.