Hingoli News: वगरवाडीत होणार निसर्ग पर्यटन केंद्र; ९ कोटींचा निधी मंजूर

Hingoli News: वगरवाडीत होणार निसर्ग पर्यटन केंद्र; ९ कोटींचा निधी मंजूर

: औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे निसर्ग पर्यटन केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 9 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निसर्ग पर्यटन केंद्रात थीम गार्डन, पामटेम वृक्षांची लागवड, निरीक्षण मनोरा, पुष्प उद्यान, स्मृतीवन, जैवविविधता उद्यान, आयुष उद्यान, नक्षत्र उद्यान, बालोद्यान आदींचा समावेश असणार आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र राज्यातील पर्यटकांसाठी पर्वणी (Hingoli News) ठरणार आहे.

महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाची 23 जून रोजी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 15 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील निसर्ग पर्यटन केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. हिंगोलीचे प्रभारी विभागीय वन अधिकारी तथा नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी वगरवाडी येथे निसर्ग पर्यटन केंद्र स्थापन करण्यासह औंढा नागनाथ येथील निसर्ग पर्यटनाच्या पुर्नविकासासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले.

बारा ज्योर्तिलिंगापैकी आठवे ज्योर्तिलिंग असलेले औंढा नागनाथ तसेच जैन समाजाचे महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिरडशहापूर येथील मल्‍लीनाथ दिगंबर मंदिर व संत नामदेव महाराज यांच्या नर्सी नामदेव जन्मस्थळाजवळ हे पर्यटन केंद्र विकसित होणार असल्याने पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

केशव वाबळे हे हिंगोली येथे विभागीय वन अधिकारी असताना त्यांनी येलदरी व डोंगरकडा फाटा येथे वनउद्यान विकसित केले होते. या दोन्ही उद्यानामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध झाली होती. आता पुन्हा त्यांनी विभागीय वन अधिकारी पदाचा प्रभार स्वीकारताच वगरवाडीसह औंढा येथील उद्यानाच्या पुर्नविकासास मंजूरी मिळवून दिली आहे. त्यामुळे भूमिपुत्र असलेल्या वाबळे यांनी हिंगोलीकरांसाठी पर्यटनाचे मोठे दालन खुले केले आहे.

वगरवाडी येथील निसर्ग पर्यटन केंद्रात थिम गार्डन, पामटेम, निरीक्षक मनोरा, पुष्पउद्यान, स्मृतीवन, जैवविविधता उद्यान, आयुष उद्यान, नक्षत्र उद्यान, बालोद्यान, खुली व्यायाम शाळा, उपहारगृह, बोगन वेलिया रोपवन, भुलभुलैय्या, फुलपाखरू उद्यान, रॉक गार्डन, तलावाच्या काठावरील रोपवन, बांबू सेटम, खुले नाट्यगृह, पदपथ आदींचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 कोटी रूपये तर दुसर्‍या टप्प्यासाठी सव्वा तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे हिंगोलीचे नाव राज्याच्या नकाशावर येणार असल्याचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news