हिंगोली: तहसीलदारांच्या आश्वासनानंतर जवळाबाजार येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे | पुढारी

हिंगोली: तहसीलदारांच्या आश्वासनानंतर जवळाबाजार येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

औंढा नागनाथः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळा बाजार येथील शेतातील रस्ता रोखणाऱ्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आज (दि. 30) आमरण उपोषण केले. दरम्यान, तहसीलदार वैजनाथराव भालेराव यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

जवळा बाजार येथील आजरसोडा शिवारातील गट क्र ७५, ७६, ७७, ७८ व अन्य गटामध्ये शेती आहेत. गट क्र. ७४ च्या दक्षिणेकडील बाजूने शेतात जाण्यासाठी पूर्वावार रस्ता आहे. परंतु शेत मालक सखुबाई चिंतामणी गोपनपल्ले आणि त्यांची मुले (कैलास, बाळू, राजू, विकास) सतत रस्त्यामध्ये आडथळे निर्माण करून रस्ता आडवत आहेत. यावरून मागील ८-१० वर्षांपासून नेहमीच वाद होत आले आहेत. सतत होणारे वाद टाळावेत म्हणून आम्ही वेळोवेळी निवेदने देऊनही त्याची दखल घेतलेली नाही.

मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केल्यास सखुबाई आणि त्यांची मुले ट्रॅक्टर मालकास धमकी देतात. रस्त्यावर ट्रॅक्टरसमोर आडवे झोपतात. त्यांच्या धमकीमुळे कोणीही आमच्या शेतात ट्रॅक्टर घेऊन येण्यास तयार होत नाही. त्यामुळे आमच्या शेतातील मशागतीची कामे व पेरणीची कामे खोळंबलेली आहेत.

या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदाशिव भुरके, भगवान अंभोरे, रानबा धडके, गजानन वाजे, दत्ता वाजे, उत्तम वाजे, नामदेव वाजे, शिवाजी वाजे, सोनाजी वाजे, गजानन वाजे, शेख फारूख शेख शिकूर, शेख खलील शेख शिकूर, प्रताप आहेर आदी शेतकऱ्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा 

Back to top button