हिंगोली : बेलमंडळमध्ये घरावर छापा टाकून साडेतीन लाखांचा गुटखा जप्‍त; दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : बेलमंडळमध्ये घरावर छापा टाकून साडेतीन लाखांचा गुटखा जप्‍त; दोघांवर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकून ३ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुरुवारी (दि.२९) रोजी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकास अटक करण्यात आली आहे.

कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील गणेश बाबाराव पारवे याच्या घरात गुटख्याची पोते लपवून ठेवली असून ती विक्रीसाठी इतर ठिकाणी नेली जाणार असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार शिवाजी पवार, विठ्ठल जाधव, शेख अन्सार, नागोराव बाभळे, वामन हिवरे, राजीव जाधव यांच्या पथकाने आज गुरूवारी (दि.२९) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बेलमंडळ येथील गणेशच्या घरावर छापा टाकला.

छाप्याच्या तपासणीत ३ लाख ८१ हजार रूपयांच्या किमंतीचा गुटख्याची पोती जप्त करण्यात आली. यानंतर गणेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने सदरील पोती विनोद नरवाडे याने आणून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी गणेश पारवे, विनोद नरवाडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विनोद नरवाडेचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button