

Nanded Drought Relief Plan
नायगाव : नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना आखून विकासकामांचा आराखडा तयार करावा, तसेच नांदेड येथील क्रीडा संकुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या.
या शिष्टमंडळात माजी आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्ह्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, विकासकामे आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी क्रीडासुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
दिवंगत अजित पवार यांनी नांदेडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या क्रीडा संकुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. ग्रामीण भागातील गायरान जमिनीवर नियमानुसार क्रीडांगणे, धावपट्ट्या आणि खुली व्यायामशाळा (ओपन जिम) उभाराव्यात. यामुळे सैन्यदल आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना आवश्यक सुविधा मिळतील, असेही शिष्टमंडळाने नमूद केले.
दिवंगत अजित पवार यांच्या नावाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक योजना सुरू करावी. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासह विविध विकासकामांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.