

Painganga River Bank Farmers
हिमायतनगर : पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी हळद, ऊस यांसह अन्य पिके करपू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पैनगंगा नदीकाठच्या मंगरूळ, वारंगटाकळी, धानोरा, कौठा आणि कौठा तांडा परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देताना अडचणी येत असून, पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
पैनगंगा नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकरी दरवर्षी हळद आणि उसाची लागवड करतात. यंदा पावसातील खंडामुळे आधीच पिके अडचणीत असताना कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सिंचन करणे अशक्य झाले आहे. पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यात पाणी मिळत नसल्याने उत्पादन घटण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरू करावा. अन्यथा पाणीटंचाईमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नायब तहसीलदारांकडे विचारणा केली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वीजपुरवठा पूर्ववत करावा; अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी नितेश जैस्वाल, नारायण देवकते, पांडुरंग सुरोशे, राजू शिंदे, आनंदा बाचकलवाड, सूरज चितलवाड, दत्ता कदम, शंतनू वळशे, अक्षय कदम, कृष्णा जाधव, ज्ञानदीप नरवाडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.