Opposition's conspiracy to defame the government: MP Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नीट पेपर फुटीचा मुद्दा हा गंभीर होता हे मान्य करावेच लागेल, परंतु त्यामागे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांचे होते, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आता विरोधकांनी इथेनॉलचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे त्यामुळे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही राजीनामा मागतील. विरोधी पक्षांच्या या कटकारस्थानापासून आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' या मोदी सरकारच्या नाविन्यपूर्ण देशभक्तीपर उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षांचे हे कटकारस्थान थांबविले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, नीट पेपरफुटीमुळे युवा पिढीमध्ये निर्माण झालेला रोष साहजिक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ते मान्य केले. याप्रकरणी पंतप्रधानांनी तात्काळ सीबीआय चौकशी लावली. सीबीआयने या प्रकरणात 14 लोकांना अटक केली आहे, एवढेच नव्हे तर नवीन कायदा अंमलात आणून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल केला आहे
नीटचा मुद्दा संपला नाही, तोच आता इथेनॉलचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी या प्रकरणाचेही राजकारण सुरू केले आहे. इथेनॉलमुळे गाड्यांचे नुकसान होत आहे, इंजिन खराब होत आहे, अशा अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र पुढे सुरू केले आहे. कोणत्याही मुद्यावरून राजीनामा सत्र कार्यक्रम सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरतील. राजकीय स्वार्थासाठी विरोधकांचे असे कार्यक्रम सुरु असल्याचा आरोप खा. चव्हाण यांनी केला.
सरकारवर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे, परंतु प्रामाणिकपणे काम करणे, आपल्यावर टाकलेली जबाबदारी सांभाळणे आपले कर्तव्य आहे. कोणतेही काम चुकीचे व्हायला नको. विरोधकांना टिकेची संधी मिळायला नको, अन्यथा जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा सल्लाही खा. चव्हाण यांनी दिला.
येत्या 12 तारखेला संभाजीनगर येथे सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या तिरंगा रॅलीला जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी किमान 500 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून मराठवाड्यातील भाजपची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन खा. चव्हाण यांनी यावेळी केले. 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.