

BJP District President's powers frozen!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीसह कोणत्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अधिकार क्षेत्रात संघटनेचे काम सुरु ठेवावे, अशा स्पष्ट सूचना देत प्रदेश भाजपाने जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक अधिकारावर गदा आणल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना चालवायची कशी? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय वर्तुळात अत्यंत शिस्तप्रिय आणि संघटन कौशल्यावर मोठी पकड निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुर्वीच्या संघटनात्मक धोरणात मोठे बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांचे निर्णय सर्वमान्य मानल्या जाणाऱ्या भाजपात आता जिल्हाध्यक्ष हे पद नामधारी बनले आहे.
एकेकाळी पक्षात लोकप्रतिनिधी आणि संघटना यात मोठे अंतर पहावयास मिळत होते. संघटनेने घेतलेले निर्णय लोकप्रतिनिधींसाठी बंधनकारक होते. परिणामी संघटना हीच सर्वस्वी मानली जायची आणि त्याच आधारे संघटनवाढीला मोठे बळ मिळायचे. परंतु प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या कारकिर्दीत या धोरणात कमालीचे बदल झाल्याचे पहावयास मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्षांना कुठल्याही कामासाठी निधी मागणीचा अधिकार राहिलेला नाही, जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची शिफारस करता येणार नाही, पदाधिकारी निवडीचा अधिकार नाही, एवढेच नव्हे, तर कुठलाही कार्यक्रम, मोर्चे, आंदोलन प्रदेश कार्यालयाच्या परवानगीशिवाय घेण्याचाही अधिकार जिल्हाध्यक्षांकडे ठेवण्यात आलेला नाही.
मंत्री, राज्यमंत्री तसेच आमदारांकडेही निधी मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. आमदार सांगतील त्याच कार्यकर्त्याला निधी, ही प्रथा आता नव्याने रुढ झाली आहे. यामुळे कार्यकर्तेही जिल्हाध्यक्षांच्या दालनाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाध्यक्षांच्या अधिकारावर प्रदेशपातळीवरून आलेल्या अतिक्रमणामुळे जिल्ह्यात संघटना चालवायची कशी? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांना सामोरे कसे जायचे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
गटबाजीला उधाण
जिल्हाध्यक्षांचे अधिकार काढून घेताना पक्षाने "एक व्यक्ती एक पद' या मूळ तत्वालाही बगल दिली आहे. जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदे असूनही संघटन वाढीला मात्र ब्रेक लागल्याचे दिसते. दुसरीकडे स्थानिक नेते मात्र कामाचे श्रेय लाटण्यात व्यस्त आहेत. दोन खासदारांच्या श्रेयवादातून गटबाजीला मात्र चांगलेच उधान आले आहे.