Nanded News : नांदेड जिल्हा बँकेमध्ये आज अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड !

पद्मश्री श्यामराव कदम यांच्यापासून ते भास्करराव खतगावकर यांच्यापर्यंतच्या अनेक दिग्गजांनी नेतृत्व केल्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यासाठी सर्व नवनिर्वाचित बँकेच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत.
Nanded News
Nanded News : नांदेड जिल्हा बँकेमध्ये आज अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड !File Photo
Published on
Updated on

Election of Chairman and Vice-Chairman at Nanded District Bank today!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : पद्मश्री श्यामराव कदम यांच्यापासून ते भास्करराव खतगावकर यांच्यापर्यंतच्या अनेक दिग्गजांनी नेतृत्व केल्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यासाठी सर्व नवनिर्वाचित बँकेच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत.

Nanded News
Nanded News : भाजप जिल्हाध्यक्षांचे अधिकार गोठवले !

गेल्या महिन्यामध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या संचालकांच्या निवडीची अधिसूचना लातूरच्या विभागीय सह निबंधकांनी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्यानंतर लगेचच जिल्हा उप निबंधकांच्या सूचनेनुसार बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष सभेची सूचना नव्या संचालकांना पाठविली. त्यानुसार आज, सोमवारी बँकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या दरम्यान दोन्ही पदांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

बँकेच्या निर्वाचित संचालकांची संख्या २३ असून यंदा प्रथमच बँकेवर पाच महिला निवडून आल्या आहेत. तसेच या बँकेमध्ये भाजपाला प्रथमच १४ जागांसह बहुमत मिळाले आहे. त्याच्या बळावर या पक्षाशी संबंधित असलेला संचालक प्रथमच अध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. त्यासाठी चुरस असली, तरी भाजपाच्या संचालकांनी उमेदवार निवडीची बाब खा. अशोक चव्हाण यांच्यावर सोपविली आहे.

Nanded News
Nanded Crime : आईची हत्या करून मुलाने स्वतःही घेतला गळफास

ह्या बँकेमध्ये १९५८ ते १९८९ ह्या काळात जुन्या पिढीतील नेते श्यामराव कदम यांचा वरचष्मा राहिला. त्यांचे समकालीन सहकारी बँकेमध्ये केवळ नामधारी होते. कदम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत बँकेचा मोठा विस्तार केला; पण १९९०च्या दशकात त्यांचे 'कदम' थांबल्यानंतर बँकेमध्ये दुसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांचे आगमन झाले. १९९२ नंतर या बँकेत गटबाजीचा शिरकाव झाला. त्यातून शह-काटशहाचे राजकारण वाढत गेले. त्याचा बँकेच्या कारभारावर गंभीर परिणाम झाला. या राजकारणातूनच २००५च्या सुमारास तत्कालीन राजवटीने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले.

त्यानंतर तब्बल दहा वर्षे या बँकेवर प्रशासकीय राजवट राहिली. २०१५ साली बँकेत पुन्हा लोकनियुक्त संचालकांची राजवट सुरू झाली. पूर्वीच्या वेगवेगळ्या प्रकरणातले धडे घेऊन संचालकांनी ही बँक 'चौकशीमुक्त' राहील, याची खबरदारी घेतली. मागील १० वर्षांत अनेक नव्या कार्यकर्त्यांना बँकेत नेतृत्वाची संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून अनेक माजी संचालक कायद्यान्वये किंवा स्वेच्छेने बाद झाले. याच निवडणुकीतून बँकेमध्ये 'अशोक पर्व' अवतरले असून ह्या पर्वातला पहिला अध्यक्ष-उपाध्यक्ष सोमवारच्या बैठकीनंतर आपल्या पदावर विराजमान होईल.

दोन्ही पदे बिनविरोध ?

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची सभा सोमवारी दुपारी १ वाजता सुरू होताच १ ते १.३० ही वेळ नामनिर्देशन अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर अर्जाची छाननी, वैध नामनिर्देशन पत्रांची प्रसिद्धी, माघार व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी याकरिता २.३० पर्यंतचा कालावधी ठेवण्यात आला आहे. मतदान घ्यावे लागल्यास २.३० ते ३.३० हा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. त्यानंतर ३.३० ते ४ पर्यंत मतमोजणी प्रक्रिया केली जाणार असून ४ वाजता निकाल जाहीर होणार आहे. एकंदर रागरंग पाहता, दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news