

We will accept whatever decision MP Sharad Pawar makes: Kamalkishore Kadam
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत पक्षाचे संस्थापक नेते खा. शरद पवार हे जो काही निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पक्षाचे हित कशात आहे, हे विचारात घेऊन पवार योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी गुरुवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारस तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर पक्षाच्या दोन्ही गटांतील अनेक नेत्यांनी विलीनीकरणावर अनुकूलता दर्शविल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे अर्स आणि नंतरच्या समाजवादी काँग्रेसपासूनचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे कमलकिशोर कदम यांनीही विलीनीकरणास अप्रत्यक्षपणे समर्थन दिले. या बाबतीत योग्य तो निर्णय शरदरावच घेतील, असे त्यांनी नमूद केले.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षातील आजी-माजी आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्यासोबत गेला होता. पण जे मोजके आणि महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्यासोबत राहिले, त्यांत कमलकिशोर कदम हे एक होते. पक्षातील पेचप्रसंगांनंतर त्यांनी अनेकदा शरद पवारांची भेट घेतली. पक्षाने सोपविलेले काम त्यांनी पार पाडले. त्याचवेळी अजित पवार आणि त्यांच्या गटाशी कटुता निर्माण होणार नाही याचीही त्यांनी दक्षता घेतली.
शरद पवार यांचे माझ्यासह अनेक जुने सहकारी सक्रिय राजकारणातून एकप्रकारे निवृत्त झालेले आहेत. हिंडण्या-फिरण्यास मर्यादा आलेल्या आहेत, याकडे लक्ष वेधून कदम यांनी पक्षासंबंधी खा. शरद पवार योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे एकत्रिकरण झाले पाहिजे, अशी भूमिका गुरुवारी येथे मांडली. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावी, ही पक्षातल्या इतर मंत्री व आमदारांची सूचनाही चिखलीकर यांनी उचलून धरली.