

धर्माबाद: 'शाळा हे शिक्षणाचे मंदिर' असे मानले जाते, मात्र धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था पाहता, हे मंदिर आता विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र आहे. ६२ वर्षे जुन्या असलेल्या या शाळेची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुमारे ६२ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीची आजवर कोणतीही मोठी दुरुस्ती किंवा नुतनीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी, इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर छताचे लोखंडी सळई पूर्णपणे गंजून बाहेर आले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते; छत गळत असल्याने वर्गांत पाणी साचते, तर विद्युत वायरिंग उघड्या अवस्थेत असल्याने शॉर्टसर्किटचा धोकाही वाढला आहे. गंजलेल्या छताच्या लोंबकळत्या भागाखाली जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
इमारतीच्या दुरवस्थेमुळे अनेक पालकांनी भीतीपोटी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. "शाळा म्हणजे शिक्षणाचे मंदिर, पण आमच्या मुलांसाठी ते मृत्यूचे दार ठरत आहे. प्रशासन कोणतीही हालचाल करत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे," अशा शब्दांत पालकांनी आपली व्यथा मांडली.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी वेळोवेळी पंचायत समिती कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे इमारतीच्या दुरुस्तीबाबत निवेदने दिली आहेत. मात्र, अद्यापही आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. केवळ पाहणी करून अधिकारी परत जात असल्याने संताप वाढत आहे.
शाळेची गंभीर अवस्था पाहता, आता स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर प्रशासनाने तातडीने नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करून बांधकामाला सुरुवात केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल; असा इशारा सरपंच प्रतिनिधी शिवराज पाटील भंडगे, युवा नेते साईनाथ पाटील जाधव आणि नागनाथ पाटील माळगे यांनी दिला आहे.