

मुंबई: खिचडी बनवण्यासाठी काही वेळासाठी घरी गेलेल्या एका महिलेसह तिच्या पाच मुलांचा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला. या दुर्घटनेत कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य मोईनउद्दीन शाह बचावले असून, पत्नी आणि पाच मुलांना गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अख्तर जहाँ मोईनउद्दीन शाह (३५) या दिवसभर मुलांसह शेजारच्या घरी थांबल्या होत्या. सायंकाळी मुलांसाठी खिचडी बनवण्यासाठी त्या राहत्या घरी गेल्या. त्याचवेळी त्यांचे पती मोईनउद्दीन शाह काही खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी बाहेर गेले होते. अवघ्या अर्ध्या तासात तीन मजली घर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आणि अख्तर जहाँ यांच्यासह संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली दबले.
या दुर्घटनेत अख्तर जहाँ यांच्यासह त्यांची १४ वर्षीय मुलगी कैसरजहाँ, सहा वर्षीय जलाउद्दीन, तीन वर्षीय अनामिया, सात वर्षीय मुनाफ आणि शेजारी राहणारी सहा वर्षीय आलिया अल्लाउद्दीन शेख हिचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने अथक प्रयत्न करून सर्वांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले; मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
कैसरजहाँ ही कुटुंबातील मोठी मुलगी होती. अभ्यास, खेळ आणि इतर उपक्रमांमध्ये ती नेहमीच पुढे असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. "अख्तर जहाँ त्या वेळी मुलांसह घरी गेल्या नसत्या, तर आज त्या आणि मुलं वाचली असती," अशी हळहळ परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. पत्नी आणि पाच मुलांना एका क्षणात गमावलेल्या मोईनउद्दीन शाह यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. "माझी मुलं मला परत करा," असा त्यांचा हंबरडा परिसरातील प्रत्येकाला हेलावून गेला.
संबंधितांवर गुन्हा दाखल
मानखुर्द इमारत दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर मानखुर्द पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात इमारत मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडीमालक, तसेच अनधिकृत बांधकामास जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणार्या संबंधित खाजगी आणि शासकीय अधिकार्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मोहम्मद मुख्तार अब्दुल अली शेख यांच्या तक्रारीवरुन मानखुर्द पोलिसांनी सोमवारी संबंधित दोषी आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे. चार मजली बांधण्यात आलेली ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तरीही इमारतीच्या शेजारीच मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या. त्यामुळे इमारतीचा काही भाग झोपड्यावर कोसळला.