

कावेरी गिरी
समाजशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, अशा हिंसक घटना केवळ अचानक घडत नाहीत. यामागे अनेक वर्षांची मानसिक घुसमट आणि वर्तनातील बदल असतात, ज्याकडे पालक कौटुंबिक वाद म्हणून दुर्लक्ष करतात. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ तीव्र तणावाखाली वावरते, तेव्हा तिच्या मेंदूतील सारासार विचार करण्याची क्षमता क्षीण होते. याला वैद्यकीय भाषेत 'अँटिसोशल पर्सनालिटी डिसऑर्डर' किंवा तीव्र नैराश्यातून आलेली विकृती म्हटले जाऊ शकते.
नुकतीच एक अत्यंत धक्कादायक आणि समाजमन सुन्न करणारी बातमी समोर आली. सरकारी नोकरी मिळवण्याच्या वादातून किंवा त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहातून एका उच्चशिक्षित मुलीने थेट आपल्या जन्मदात्या आईलाच मारण्याची सुपारी दिली. आई आणि मुलीच्या अत्यंत हळव्या, संवेदनशील नात्याला काळिमा फासणारी ही घटना केवळ एक गुन्हेगारी वृत्त म्हणून सोडून देता येण्यासारखी नक्कीच नाही. ही घटना एका विशिष्ट कुटुंबापुरती मर्यादित नसून, आपल्या संपूर्ण सामाजिक जडणघडणीला, शिक्षण व्यवस्थेला आणि आधुनिक जीवनशैलीतील विदारक चित्र अधोरेखित करते.
जेव्हा एखादा अट्टल गुन्हेगार गुन्हे करतो, तेव्हा समाज त्याकडे 'अज्ञानातून किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेला गुन्हा' म्हणून पाहू शकतो; परंतु जेव्हा उच्चशिक्षित, चांगल्या वातावरणात वाढलेली तरुण पिढी इतक्या लहान वयात अशा टोकाच्या आणि विकृत गुन्हेगारीकडे वळते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो, लहान वयातच मुलांची मानसिकता इतकी क्रूर कशी झाली? यामागील नेमकी कारणमीमांसा काय आहे?
यशाचा 'हायपर-कंपेटिटिव्ह' दबाव आणि फ्रस्ट्रेशन
आजच्या घडीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे, प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवणे किंवा कोट्यवधीचे पॅकेज मिळवणे म्हणजेच यशस्वी होणे असे मानले जाते. कधी कधी आई-वडील, आजी-आजोबांनंतर मिळणाऱ्या संपत्तीचा हव्यास जीवघेणा ठरलेला दिसतो. अलीकडील झालेल्या घटनांवरून मुलांची, तरुण-तरुणींची मानसिकता कुठे चालली आहे, याचा ऊहापोह हाेणे अत्यंत गरजेचे आहे.
या प्रवासात तरुणांवर तीन स्तरांवर दबाव असतो. पहिला म्हणजे, स्वतःच्या अवास्तव अपेक्षांचा, दुसरा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आणि तिसरा नातेवाईक व समाजाच्या टोमण्यांचा. वय वाढत जाते, हातातील वेळ निसटत जाते आणि नोकरी मिळण्याची शक्यता धूसर होत जाते, तेव्हा निर्माण होणारा 'क्रॉनिक फ्रस्ट्रेशन'चा (दीर्घकालीन हताशतेचा) डोंगर हा विवेक बुद्धी नष्ट करतो. सायकोसायन्स सांगते की, जेव्हा एखाद्या व्यक्तीची इच्छा दीर्घकाळ अपूर्ण राहते, तेव्हा त्याचे रूपांतर आधी चिडचिडेपणात, मग रागात आणि शेवटी तीव्र हिंसेत होते. नोकरी किंवा करिअरच्या आड येणारी कोणतीही गोष्ट, मग ती स्वतःची आई का असेना, ती त्यांना आपला शत्रू वाटू लागते.
भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव
आपण मुलांना 'साक्षर' करत आहोत; पण 'सुजाण' करत आहोत का, हा आजचा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. नैतिक मूल्यांची (Moral Values) आणि भावनिक बुद्धिमत्तेची (Emotional Intelligence) कमालीची घसरण होत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
पुस्तकी ज्ञानात अव्वल असणारा तरुण भावनिकदृष्ट्या इतका पोकळ आणि कमकुवत झाला आहे की, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जात आहे. 'काहीही करून मला जे हवे ते मिळालेच पाहिजे' या अट्टाहासापायी योग्य आणि अयोग्य यातील फरक करण्याची क्षमता संपत चालली आहे. संवेदनशीलता, कृतज्ञता, दया-करुणेची भावना नष्ट होते, तेव्हाच एखादी मुलगी आपल्या आईचा जीव घेण्यासारखा क्रूर विचार करू शकते. या ठिकाणी नीतीमूल्यांची झालेली मोठी दिवाळखोरी दिसते आहे.
आभासी जग आणि 'इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन'ची सवय
आजची पिढी ही 'डिजिटल नेटिव्ह' आहे. त्यांचा जन्म आणि वाढ इंटरनेटच्या युगात झाली आहे. सोशल मीडियावरील रील्स, शॉर्टस् आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना 'इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन' म्हणजे प्रत्येक गोष्ट झटपट मिळवण्याची सवय लागली आहे. दोन सेकंदांत रील बदलणारे मन हे खऱ्या आयुष्यातील संघर्षासाठी लागणारा संयम गमावून बसले आहे.
जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळत नाही, तेव्हा ही मुले अस्वस्थ होतात. त्यातच वाढता इंटरनेटचा प्रभाव, सोशल मीडियावरील गुन्हेगारीवर आधारित कंटेंट (उदा. क्राईम थ्रिलर्स) पाहताना गुन्हा कसा करायचा, याचे 'प्लॅनिंग' तरुण मन नकळत करत असते, असे म्हणायला हरकत नाही. ‘सुपारी देऊन काम फत्ते करता येते आणि आपण सहज सुटू शकतो’ हा आभास खऱ्या आयुष्यात अंमलात आणण्याचा मूर्खपणा सुशिक्षित तरुण करत आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीचा वापर अभ्यासासाठी करण्याऐवजी गुन्ह्याची योजना आखण्यासाठी केला जाणे, ही देखील तंत्रज्ञानाची भयानक बाजू आहे.
कुटुंबातील संवादाचा अभाव आणि 'करारात्मक' नाती
पूर्वी कुटुंबात सुख-दुःख वाटून घेण्यासाठी, अपयशात पाठीवर हात ठेवण्यासाठी आजी-आजोबा, काका-काकू किंवा मोठी माणसे असायची. आज एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली असून विभक्त कुटुंबातही संवाद उरलेला नाही. एकाच छताखाली राहूनही आई-वडील आणि मुले एकमेकांसाठी अनोळखी होत चालली आहेत. संवाद संपल्यामुळे संशय, राग आणि कटुता वाढत जाते.
अनेकदा पालकांच्या अवाजवी अपेक्षाही मुलांसाठी फास ठरतात. ‘आम्ही तुझ्यावर लहानपणापासून एवढा खर्च केला, आमच्या समाजातल्या प्रतिष्ठेसाठी तुला ही नोकरी मिळालीच पाहिजे,’ हा सुप्त दबाव मुलांच्या मनात पालकांबद्दल आदर निर्माण करण्याऐवजी एक प्रकारचा आकस किंवा भीती निर्माण करतो. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि विश्वासाऐवजी जेव्हा केवळ 'अपेक्षांचे करार' उरतात, तेव्हा अशा करारांचे पर्यवसान हिंसक वादात होते. मुलांचे मानसिक पोषण न करता केवळ भौतिक पोषण केल्याचा हा दुष्परिणाम आहे.
सहानुभूतीची वाढती कमतरता आणि आत्मकेंद्री वृत्ती
आजच्या तरुण पिढीत 'मी, माझे आणि मलाच' ही आत्मकेंद्री वृत्ती प्रचंड वाढली आहे. दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव असणे म्हणजेच 'सहानुभूती'. आजच्या मुलांमध्ये ही भावना कमालीची बोथट झाली आहे. याचे कारण म्हणजे, बालपणापासून त्यांना मिळणारे अवाजवी लाड आणि प्रत्येक हट्ट पूर्ण करण्याची पालकांची पद्धत. यामुळे मुलांना 'नाही' ऐकण्याची सवयच राहत नाही.
जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईला मारण्याची सुपारी देते, तेव्हा तिच्या मनात आईच्या वेदनेचा, तिच्या मृत्यूचा किंवा तिच्या संघर्षाचा एक क्षणही विचार येत नाही, हे दृश्यच भयावह आहे. आईची माया, सहानुभूती, भावना पूर्णपणे नाहीशा झाल्यासारखाच हा प्रकार आहे. तिथे फक्त मी, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा राग आणि स्वतःचे अपयशाचे कारण दूर करणे एवढेच दिसत राहते.
ही मानसिक विकृती आहे का?
समाजशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, अशा हिंसक घटना केवळ अचानक घडत नाहीत. यामागे अनेक वर्षांची मानसिक घुसमट आणि वर्तनातील बदल असतात, ज्याकडे पालक कौटुंबिक वाद म्हणून दुर्लक्ष करतात. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ तीव्र तणावाखाली वावरते, तेव्हा तिच्या मेंदूतील सारासार विचार करण्याची क्षमता क्षीण होते. याला वैद्यकीय भाषेत 'अँटिसोशल पर्सनालिटी डिसऑर्डर' किंवा तीव्र नैराश्यातून आलेली विकृती म्हटले जाऊ शकते. आपल्या अपयशाला किंवा त्रासाला आपली आई किंवा कुटुंबच कारणीभूत आहे, असा एक काल्पनिक ग्रह ही मुले मनात पक्का करून घेतात आणि मग त्यातून असे टोकाचे पाऊल उचलले जाते.
पालकांनी आपल्या मुलांना केवळ जिंकण्याचे कौतुक न शिकवता अपयशाला कसे सामोरे जायचे, हे शिकवणे काळाची गरज आहे.
मुलांच्या वर्तनात अचानक होणारे बदल, त्यांचा एकटेपणा, चिडचिडेपणा किंवा टोकाचा राग याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. शाळा आणि महाविद्यालयातून नियमित समुपदेशन सक्तीचे केले पाहिजे.
कुटुंबात दररोज किमान एक तास असा असावा जिथे मोबाईल, लॅपटॉप बाजूला ठेवून केवळ संवाद होईल. मुलांनी आपल्या मनातील भीती, अपयशाची चिंता पालकांजवळ मोकळेपणाने बोलले पाहिजे.
केवळ करिअर आणि पैसा ओरिएंटेड शिक्षण देण्याऐवजी मानवी मूल्ये, नात्यांचा आदर आणि संवेदनशीलता जपणारे शिक्षण शालेय स्तरापासूनच दिले गेले पाहिजे. मुलांना श्रमाची आणि कष्टाची किंमत कळू दिली पाहिजे.
आपण भौतिक प्रगती करत असताना कौटुंबिक आणि मानसिक पातळीवर किती घसरत चाललो आहोत, याचा गंभीरपणे विचार करणे अत्यावश्यक बनले आहे.