Sahasrakund Waterfall | दिवाळीच्या आधीच सहस्रकुंड धबधबा कोरडा; निसर्गप्रेमींचा हिरमोड

पैनगंगेचा प्रवाह खंडित; मनमोहक जलसौंदर्य अनुभवण्यासाठी आता पुढील पावसाळ्याची प्रतीक्षा
Painganga River Water Level Sahasrakund Dry
ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात पैनगंगेचा प्रवाह खंडित झाल्याने सहस्रकुंड धबधब्याचे पात्र जवळपास कोरडे पडले Pudhari
Published on: 
Updated on: 

Painganga River Water Level Sahasrakund Dry

प्रशांत भागवत

उमरखेडः दिवाळीच्या सुट्यांमध्ये पैनगंगा नदीचे झुळझुळ वाहणारे संथ पाणी, त्यावर पांढऱ्या शुभ्र फेसाळ धारेने शांतपणे कोसळणारा सहस्रकुंड धबधबा आणि सभोवतालच्या निसर्गाचे मनमोहक रूप... हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची पावले सहस्रकुंडकडे वळतात. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात पैनगंगेचा प्रवाह खंडित झाल्याने सहस्रकुंड धबधब्याचे पात्र जवळपास कोरडे पडले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. आता या धबधब्याचे पूर्वीचे वैभव अनुभवण्यासाठी पर्यटकांना पुन्हा जुलै-ऑगस्टमधील पावसाळ्याची वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातील व तेलंगणातील पर्यटकांसाठी सहस्रकुंड धबधबा हे निसर्गसौंदर्याचे प्रमुख आकर्षण आहे. पैनगंगा नदीच्या पात्रातील खडकांवरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारे असंख्य जलप्रवाह, शुभ्र फेसाळणाऱ्या धारा आणि पाण्याच्या नादाने भारलेला परिसर पर्यटकांना मोहून टाकतो. पावसाळ्यानंतरही काही काळ टिकून राहणारा नदीचा प्रवाह या परिसराचे सौंदर्य अधिक खुलवतो. मात्र, यंदा पावसातील खंड, पाण्याची घटलेली उपलब्धता आणि नदीपात्रातील लोप पावलेला प्रवाह यामुळे ऑक्टोबरमध्येच धबधब्याचे वैभव लोप पावल्याचे दिसत आहे.

Painganga River Water Level Sahasrakund Dry
Nanded News : रस्‍त्‍याचे काम सुरू तरीही सिमेंटचा लेप देऊन रस्‍त्‍याची दुरुस्ती कशासाठी?

गेल्या वर्षीही सहस्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्यासाठी ३० जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. सर्व प्रथम दै, "पुढारी" नेच हे वास्तव वृत्तांतातून समोर आणले होते. यंदा मात्र पावसाळा संपल्यानंतर काही आठवड्यांतच धबधब्याची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी वर्षात पावसाचे स्वरूप कसे राहणार, पैनगंगा नदीचा प्रवाह किती काळ टिकणार आणि सहस्रकुंडचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा कितपत अनुभवता येणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

केवळ पर्यटनाचा नव्हे, पर्यावरणाचाही प्रश्न

सहस्रकुंड धबधब्याचे कोरडे पडणे ही केवळ पर्यटकांच्या दृष्टीने नव्हे तर,. नदीचा प्रवाह हा नदीकाठच्या ४७ गावांमधील पाणीपुरवठा, विहिरींची पाणीपातळी, पशुधनाची तहान आणि स्थानिक जैवविविधतेशी निगडित आहे. नदीपात्रात पाणी कमी झाल्यास त्याचा परिणाम भूजल पुनर्भरणावर होण्याची शक्यता असते. परिणामी, नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

Painganga River Water Level Sahasrakund Dry
Nanded Accident : टेम्पो दरीत कोसळून तीन ठार

यंदा ऑक्टोबरमध्येच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन आणि नदीकाठच्या गावांच्या गरजांचा समतोल राखणे आवश्यक ठरत आहे. पाण्याचा वापर केवळ तात्कालिक गरजांपुरता मर्यादित न ठेवता आगामी उन्हाळ्याचा विचार करून जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्याची गरज आहे.

इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

पैनगंगा नदीतील घटता प्रवाह लक्षात घेता इसापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळावा, भूजलपातळी टिकून राहावी आणि नदीचा प्रवाह पूर्णपणे खंडित होऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही पाणीटंचाईच्या काळात इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, धरणातील उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, सिंचनाच्या गरजा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची तांत्रिक व्यवहार्यता विचारात घेऊनच याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. धरणातून पाणी सोडल्यास ते नदीच्या कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचेल, त्याचा प्रत्यक्ष लाभ किती गावांना होईल आणि उपलब्ध पाण्याचा किती काळ उपयोग करता येईल, याचेही नियोजन गरजेचे आहे.

Painganga River Water Level Sahasrakund Dry
Nanded Crime : कर्ज फेडण्यासाठी वापरला विम्याचा फंडा

पुढील पावसाळ्यापर्यंत प्रतीक्षा?

सहस्रकुंड धबधबा हे या परिसराचे नैसर्गिक वैभव आहे. त्याचे आकर्षण केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी नदीचा नैसर्गिक प्रवाह टिकवण्यासाठी दीर्घकालीन जलसंधारण आणि शास्त्रीय पाणीव्यवस्थापन आवश्यक आहे. नदीपात्रातील पाण्याची उपलब्धता, पावसाचे प्रमाण आणि धरणातील जलसाठा यांचा एकत्रित विचार करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या आनंददायी वातावरणात सहस्रकुंडचे फेसाळते रूप पाहण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या पर्यटकांना यंदा कोरड्या खडकांचे दर्शन घ्यावे लागत आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने बहाल केलेले हे सौंदर्य पुन्हा अनुभवण्यासाठी आता पुढील पावसाळ्याची प्रतीक्षा करावी लागणार का, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर पैनगंगेचा प्रवाह टिकवण्यासाठी प्रशासनाकडून वेळीच ठोस पावले उचलली जाणार का, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news