

धर्मराज गायकवाड
हदगावः शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नवीन रस्त्याच्या कामात काही ठिकाणी सिमेंटचा लेप देऊन दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसून येत असून नवीन रस्त्याचे काम सुरू असतानाच काही भागात अशा प्रकारे दुरुस्ती करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, असा सवालत आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
या कामाबाबत यापूर्वीही नागरिकांकडून अंदाजपत्रकातील तरतुदी,तांत्रिक निकष आणि कामाची प्रत्यक्ष गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ते अंदाजपत्रकानुसार आणि निर्धारित तांत्रिक मानकांनुसार सुरू आहे का? याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामाबरोबरच परिसरात करण्यात आलेल्या नाल्यांच्या कामाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाल्यांची दिशा,पाण्याचा प्रवाह आणि नाल्याचा अंतिम जोडबिंदू याबाबत योग्य नियोजन झाले आहे का? तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे का? याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.
विशेष म्हणजे नवीन रस्त्याच्या कामात काही ठिकाणी सिमेंटचा लेप देऊन दुरुस्ती करण्यात आल्याचे दिसत असल्याने, त्या ठिकाणी अशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता का भासली? याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही दुरुस्ती कामाच्या प्रक्रियेतील नियोजित बाब आहे की कामाच्या एखाद्या भागात सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे याची माहितीही मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
हदगाव शहरातील विकासकामे सार्वजनिक निधीतून होत असल्याने ती अंदाजपत्रकातील तरतुदी, तांत्रिक मानके आणि निर्धारित नियमांनुसार होणे अपेक्षित आहे.त्यामुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याची गुणवत्ता,वापरण्यात येणारे साहित्य,रस्त्याची जाडी, पृष्ठभागाची गुणवत्ता तसेच इतर आवश्यक तांत्रिक बाबींची संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या काही विकासकामांची जबाबदारी संबंधित बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची मोजमापे,अंदाजपत्रकातील निकष आणि प्रत्यक्ष काम यांची पडताळणी करावी. तसेच नवीन बांधण्यात येणारा रस्ता दीर्घकाळ टिकावा आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी काम पूर्ण होण्यापूर्वी आवश्यक त्या तांत्रिक तपासण्या करणे गरजेचे आहे.
संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून नवीन रस्त्याच्या कामात ज्या ठिकाणी सिमेंटचा लेप देऊन दुरुस्ती करण्यात आली आहे, त्या कामाची आवश्यकता काय होती, तसेच संपूर्ण रस्त्याचे काम अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार सुरू आहे का, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे.