

बाळासाहेब पांडे
नायगाव : तालुक्यात खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. पावसाने अचानक घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशेचे पाणीही आता आटू लागले आहे. जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर मोठ्या उत्साहात केलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांची पेरणी पूर्ण झाली. बीज अंकुरले आणि रोपे जोमाने वर आली; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण शिवार चिंतेच्या छायेत आहे.
ढग येतात, पण बरसत नाहीत
सकाळपासून सायंकाळपर्यंत काळे ढग आकाश व्यापतात, तेव्हा पाऊस येईल अशी आशा निर्माण होते. मात्र, वाऱ्याच्या एका झोतासह हे ढग विरून जातात. पावसाचा थेंबही न पडल्याने पिकांना जीवदान मिळत नाही. वाढत्या उकाड्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, नुकतीच उगवलेली पिके आता पिवळसर पडू लागली आहेत.
शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात
शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे आणि मशागतीवर लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. अनेकांनी बँकांचे कर्ज काढले, तर काहींनी दागिने किंवा जमिनीची कागदपत्रे तारण ठेवून शेती उभी केली आहे. आता या सर्व कष्टांचे भवितव्य केवळ पावसाच्या एका सरीवर अवलंबून आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच 'दुबार पेरणी'चे भीषण संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.
ढग आहेत पण पाऊस नाही; हिरवीगार शेती आता तहानेने तडफडतेय. बळीराजा आशा पेरतो, मात्र आभाळ त्याची परीक्षा घेत आहे. घाम, कर्ज आणि संघर्षावर उभी असलेली शेती आज एका पावसाच्या सरीची आर्त याचना करत आहे. पावसाचा दीर्घ खंड पडला आहे त्यामुळे जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपत आला आहे. सोयाबीन, कापूस, तूरसह सर्वच खरीप पिके धोक्यात आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक अडचणीत सापडली आहे तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी
कृषी विभागाने तातडीने शिवार पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व उपाययोजना तातडीने जाहीर कराव्यात.
संभाव्य नुकसानीसाठी आर्थिक मदत आणि पीकविमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ करावी.
पावसाचा खंड कायम राहिल्यास विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.