Latur Agriculture News : औसा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या रखडल्या

जून महिन्याअखेर फक्त ४३ टक्केच पाऊस; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे
Latur Agriculture News
Latur Agriculture News : औसा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या रखडल्याFile Photo
Published on
Updated on

Latur News: Ausa Taluka awaits substantial rainfall; Sowing delayed

औसा, पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपला तरी औसा तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. संपूर्ण जून महिन्यात सर्वात जास्त पावसाच्या दिवसात अवघ्या चार दिवसच पावसाने हजेरी लावली असून, सरासरीच्या केवळ 43 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. परिणामी भूजल पातळी झपाट्याने घसरली असून तालुक्यातील 27 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना अधिग्रहित पाणीपुरवठा सुरू असतानाच, दुसरीकडे तब्बल 74 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या पावसाअभावी पूर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आता आभाळाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत.

Latur Agriculture News
Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून खते, बियाणे आणि इतर कृषी साहित्याची खरेदी केली आहे. अनेकांनी कर्ज काढून किंवा उसनवारीवर ही तयारी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने हे साहित्य घरातच पडून आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. मृग नक्षत्र सरून दोन आठवडे उलटले, तरी तालुक्यात उन्हाचा तडाखा कायम आहे.

सध्या तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, मागील वर्षी याच काळात सुमारे ५० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र शिवारात ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्रेही दिसत नसल्याने शेतं ओस पडली आहेत. तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी ही प्रमुख खरीप पिके घेतली जातात. पाऊस आणखी लांबल्यास विशेषतः मूग व उडीद पेरणीचे नियोजन बदलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. जर उशिरा पेरणी झाली तर मूग आणि उडीद तसेच तूर पिकाच्या पेरणीवर मर्यादा येतील तसेच या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या पिकांचे क्षेत्र यंदा उशिरा पेरणीमुळे घटणार आहे.

Latur Agriculture News
Beed Agriculture News : अर्धा जून महिना संपला, पाऊस बेपत्ता!

दरम्यान, गेल्या दोन वर्षांतील चांगल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे मोर्चा वळविला होता. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे विहिरी, बोअरवेल आणि लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा घटल्याने सिंचनावरही मर्यादा आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी कृषी तज्ज्ञांनी किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणी करू नये, असा सल्ला दिला आहे.

७० हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या

शेतकऱ्यांनी खते-बियाण्यांची तयारी पूर्ण; पावसा अभावी पेरणी मात्र ठप्प झाली असून उशिरा पेरणी झाल्यास उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. पेरणीयोग्य व दमदार पावसाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news