

शिवनाथ जाधव
टाकरवन : जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला तरी माजलगाव तालुक्यासह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजाच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ तुरळक सरींनी हजेरी लावल्याने खरीप हंगामाचे नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. मशागतीची सर्व कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज असलेला शेतकरी आता चातकाप्रमाणे आभाळाकडे नजर लावून बसला आहे.
माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी त्या पेरणीयोग्य नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. गावागावातील पारावर, शिवारात आणि बाजारपेठांमध्ये सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे—"पाऊस कधी पडणार आणि पेरणी कधी सुरू होणार?"
पेरणीची तयारी पूर्ण; पाऊस मात्र गायब
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक कसरतीने आधीच खरेदी करून ठेवले आहे. अनेकांनी हवामान अंदाजावर विश्वास ठेवून पूर्व मशागतही पूर्ण केली. मात्र पाऊसच लांबल्याने ही सर्व तयारी सध्या व्यर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.
वेळेत पाऊस न झाल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पुन्हा दुबार मशागत करावी लागू शकते. त्यामुळे शेतीचा खर्च वाढणार असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाणी आणि चाऱ्याचे संकट उंबरठ्यावर
पावसाच्या दिरंगाईचा परिणाम केवळ पेरण्यांवरच नव्हे तर पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विहिरी, शेततळे आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. पाऊस आणखी लांबल्यास जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कृषिप्रधान भागात पशुधन हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक साधन मानले जाते. मात्र चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास दुग्धव्यवसायासह शेतीपूरक व्यवसायांनाही मोठा फटका बसू शकतो.
माजलगाव तालुक्यातील उजवा कालवा परिसर हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झालेली असताना कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
ऊस हे वर्षभर पाण्याची गरज असलेले नगदी पीक असल्याने पावसाअभावी त्याची वाढ खुंटण्याचा धोका निर्माण झाला आहे. "निसर्गाने साथ दिली तरच ऊस वाचेल, अन्यथा पाणी आणायचे कुठून?" असा सवाल अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत.पावसाच्या अनिश्चिततेमुळे पेरणीचे नियोजन, बियाण्यांची निवड, आंतरपीक पद्धती आणि उशिरा पेरणीसाठीचे पर्याय याबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाची गरज आहे.
प्रत्येक गावासाठी कृषी सहायकांची नियुक्ती असली तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये त्यांची उपस्थिती दिसून येत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश कृषी सहायकांचा कारभार तालुक्याच्या ठिकाणावरूनच चालत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. पावसाच्या अनिश्चित परिस्थितीत कृषी विभागाने गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
पावसाकडे आशेच्या नजरा
एकीकडे खरीप हंगामाचे नियोजन रखडले आहे, तर दुसरीकडे वाढते तापमान आणि कोरडी पडलेली शेती शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला तर परिस्थिती सावरण्याची आशा आहे; अन्यथा खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.