

Heavy rains: Sowing is underway in Himayatnagar taluka
हिमायतनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने उशिरा सुरुवात केली असल्याने महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील उन्हाची तीव्रता जैस थे अवस्थेत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. मंगळवारी सायंकाळी काही भागात पाऊस झाला होता तर आठवडे बाजाराच्या दिवशी बुधवारी दुपारी देखील जोरदार पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला असून या पावसामुळे पेरणीला वेग आला आहे.
हिमायतनगर तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या पेरण्या जूनच्या पहिल्या आठवड्यात होत होत्या यावर्षी मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. अनेक शेतकऱ्यांनी जुनच्या पहिल्या आठवड्यात हळदी पिकांची लागवड केली तर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस लागवड देखील केली होती. परंतु पावसाने मध्येच उघडीप दिली असल्याने पहिल्यांदा केलेली लागवड उन्हाच्या दाहकतेने लागवड केलेली पिके उगवली नाहीत त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागणार आहे.
बुधवारी दुपारी अचानक झालेल्या धुवांधार पावसाने आठवडे बाजार बंद करावा लागला व्यापाऱ्यांच्या माळव्याचे नुकसान झाले आहे. या महिन्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला असल्याने शहरातील नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या तर रस्त्यावर पाणी साचून असल्याने दुचाकीस्वारांना रस्ता दिसत नव्हता तब्बल दोन तास सारखा पाऊस सुरू होता.
या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने कापूस, हळद, सोयाबीन पेरणीला वेग आला आहे. या पावसामुळेचिंतेत असलेला शेतकरी आनंदी झाला आहे.