

नरेंद्र येरावार
उमरी : घराच्या अर्ध्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलानेच स्वतःच्या वडिलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उमरी तालुक्यातील शिवणगाव येथे शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) दुपारी घडली. या घटनेत पांडुरंग नागोराव सूर्यवंशी वय 65 यांचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला. उमरी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
घराच्या वाटणीवरून वडील व मुलामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. शनिवारी दुपारी या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
दरम्यान आरोपी मनोजकुमार पांडूरंग सूर्यवंशी वय 39 हा शिवणगाव ते मुदखेड रेल्वे पटरीच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अरविंद हैबतकर यांनी प्रसंगावधान राखत वेशांतर करून आरोपीचा पाठलाग सुरू केला. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत होमगार्ड हर्षवर्धन लांडगे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी दाखविलेल्या धाडसाचे आणि तत्परतेचे उमरी पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुक करण्यात आले. पोलीस अंमलदार अरविंद हैबतकर तसेच होमगार्ड हर्षवर्धन लांडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही अभिनंदन केले.
पोलीस अधीक्षक निलम रोहन यांनीही अरविंद हैबतकर व हर्षवर्धन लांडगे यांचे अभिनंदन करून त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे करीत आहेत. संपत्तीच्या वादातून घडलेल्या या गंभीर घटनेने शिवणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात यश आले आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.