

अविनाश देशमुख
मुखेड : मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर लॉगिन होत नसल्याने आणि ॲप बंद असल्यामुळे तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार शेतकरी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी ’ या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
‘पीएम किसान सन्मान निधी योजनेचा’ लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांची शेती 'नो लँड सिडिंग'मध्ये आहे किंवा नाही, हे जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून प्रमाणित करून दिले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देता येणार नाही असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगितल्या जात आहे.
मात्र, सदर पोर्टल बंद असल्याने ही प्रक्रिया रखडली असून हजारो शेतकऱी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या नावे २०१९ नंतर फेरफार होऊन शेतीची नोंद झाली आहे किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वारसा हक्काने जमीन नावावर झाली आहे, असे शेतकरी या योजनेच्या लाभासाठी सर्वाधिक प्रयत्नशील आहेत.
हे शेतकरी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र सादर करीत आहेत. दरम्यान, संबंधित कार्यालयात तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा तहसीलच्या 'नो लँड सिडिंग' प्रमाणपत्रासाठी पाठविले जात आहे.
तहसीलमध्ये संबंधित विभागाकडे यासाठी शेतकरी गेल्यानंतर तिथे लँड सिंडीगचे पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने पोर्टलची तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलबंरकर व ग्राहक पंचायतचे महेताब शेख यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.