TET Exam | आश्रमशाळांची गुणवत्ता वाढणार ; सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक

TET for Teachers | अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे
Ashram Shala Primary Teacher TET Exam
Ashram Shala Primary Teacher TET ExamPudhari
Published on
Updated on

Ashram Shala Primary Teacher TET Exam

प्रशांत भागवत

उमरखेड : राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यापुढे आश्रमशाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागातील असल्याने, त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे शासनाचे मत आहे.

Ashram Shala Primary Teacher TET Exam
TET Exam | जुन्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा ठरतेय ‘शिवधनुष्य’!

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी ही मूलभूत पात्रता असून, शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार ही अट १ एप्रिल २०१० पासून लागू आहे. त्याच धर्तीवर आता आश्रमशाळांतील प्राथमिक शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेत बदल

नवीन शासन आदेशानुसार, आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती करताना सर्वप्रथम टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येईल. जर रिक्त पदांसाठी टीईटी पात्र उमेदवार उपलब्ध नसतील, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात टीईटी अपात्र उमेदवारांची नियुक्ती करता येणार आहे. मात्र अशा नियुक्त्या केवळ एका शैक्षणिक सत्रापुरत्याच असतील.

Ashram Shala Primary Teacher TET Exam
TET Exam Maharashtra: टीईटी परीक्षेत बोगस उमेदवार रडारवर! राज्य परीक्षा परिषदेची तंत्रज्ञानाधारित तयारी

या तात्पुरत्या शिक्षकांच्या वेतनाचा संपूर्ण खर्च संबंधित संस्थांनाच उचलावा लागणार असून, शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा वेतन सहाय्य दिले जाणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टीईटी न झाल्यास सेवा समाप्ती

२०१० पूर्वी नियुक्त झालेले आणि सेवेत पाच वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या प्राथमिक शिक्षकांना यापूर्वी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. १ सप्टेंबर २०२१ ही अंतिम मुदत होती. या कालावधीतही टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील अनेक आश्रमशाळांमधील शिक्षकांवर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शासनाचे मत आहे.

तातडीने अंमलबजावणी

या शासन आदेशाची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. सर्व प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त आणि अपर आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही दिरंगाई किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

Ashram Shala Primary Teacher TET Exam
TET exam: टीईटीमुळे शिक्षक दडपणात

गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे वाटचाल

आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित, पात्र आणि सक्षम शिक्षकांकडून शिक्षण मिळावे हा या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे. टीईटी बंधनकारक झाल्यामुळे आश्रमशाळांतील अध्यापनाची गुणवत्ता वाढेल, शैक्षणिक स्तर उंचावेल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारा हा निर्णय ठरणार असून, आगामी काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news