TET Exam | जुन्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा ठरतेय ‘शिवधनुष्य’!

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण केवळ 3 ते 6 टक्के : नोकरी जाण्याच्या भीतीने अनेकांनी घेतलाय धसका
TET Exam Benefits for Old Teachers
TET Exam | जुन्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा ठरतेय ‘शिवधनुष्य’!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : जुन्या, वयोवृद्ध आणि सेवानिवृत्तीचे वेध लागलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा म्हणजे जणू काही ‘शिवधनुष्य’ ठरत आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी नोकरी जाण्याच्या भीतीने टीईटीचा धसकाच घेतल्याचे दिसत आहे.

टीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमाची जी रचना करण्यात आली आहे, ती शिक्षकांची किमान आकलन शक्ती आणि विषयज्ञान आजमावण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे. त्याच अनुषंगाने अभ्यासक्रमाची आणि परीक्षेची रचना करण्यात आलेली आहे. 150 गुणांची, दीड तासांच्या वेळ मर्यादेची आणि बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिकविणार्‍या शिक्षकांसाठी पेपर क्रमांक एक, सहावी ते आठवीपर्यंत शिकविणार्‍या शिक्षकांसाठी पेपर क्रमांक दोन आणि पहिली ते आठवी अशा कोणत्याही इयत्तेला शिकवू इच्छिणार्‍या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य ठेवण्यात आलेले आहेत.

विषय आणि अभ्यासक्रम!

पहिल्या पेपरमध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र, परीक्षार्थीने निवडलेल्या कोणत्याही दोन भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात. दुसर्‍या पेपरमध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र, परीक्षार्थीने निवडलेल्या कोणत्याही दोन भाषा, गणित, विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येकी एक मार्काचे एकूण 150 प्रश्न आणि सोडविण्याचा अवधी 90 मिनिटांचा आहे. म्हणजे सरासरी 36 सेकंदांमध्ये एक प्रश्न सोडवत गेले पाहिजे, तरच सगळा पेपर सोडविणे शक्य आहे; पण जवळपास 95 टक्के परीक्षार्थींना वेळेत हा पेपर सोडविणे शक्यच होत नाही. शिवाय ‘35 टक्के जिंदाबाद’ असा इथे मामला नाही, तर ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60 टक्के म्हणजे 150 पैकी 90 गुण मिळविणे अनिवार्य आहे.

अनेकांच्या उडतायत दांड्या!

नव्या उमेदीचे शिक्षक, नव्या जोमाने अभ्यासक्रम आत्मसात करून परीक्षेत उत्तीर्ण होताना दिसतात; पण जुन्या आणि वयोवृद्ध शिक्षकांची या नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेताना पुरती दमछाक होत आहे. त्यामुळे तर टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्रात 2013 पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा घेण्यात येतात. 2013 साली पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 4.43 टक्के लागला होता. 2014 साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल तर केवळ 1.4 टक्के लागला होता. 2013 साली घेण्यात आलेल्या सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या परीक्षेचा निकाल 5.95 टक्के आणि 2014 साली आणखी घसरून केवळ 4.92 टक्के लागला होता. त्यानंतर झालेल्या तीन-चार परीक्षेतही निकालाची टक्केवारी 3 ते 6 टक्क्यांच्या वर गेलेली नाही. त्यामुळे शिक्षकांनीच या परीक्षांचा धसका घेऊन त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. पण, आता न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील शिक्षकांना या परीक्षांना सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला दिसत नाही.

टीईटीसाठी शिक्षकांचीच शाळा घेण्याची गरज..!

टीईटी अभ्यासक्रमाचे स्वरूप, परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धत याबाबत अद्यापही राज्यातील शिक्षकांना फारशी माहिती असलेली दिसत नाही. शिवाय शासनानेही त्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारलेली दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी खुल्या बाजारात टीईटी परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांवरच भिस्त ठेवून शिक्षकांना त्याचा अभ्यास करावा लागत आहे. पण, शासकीय पातळीवरून या विषयांच्या अभ्यासासाठी तालुका किंवा जिल्हानिहाय ‘शिक्षकांच्या शाळा’ भरविण्याची आवश्यकता आहे.

मुख्य मुद्दे :

नव्या उमेदीचे शिक्षक नव्या जोमाने अभ्यासक्रम आत्मसात करून टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होत आहेत.

मात्र, जुने आणि वयोवृद्ध शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे कठीण जात आहे.

त्यामुळेच टीईटी परीक्षेतील उत्तीर्णतेचे प्रमाण अत्यल्प आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 2013 पासून टीईटी परीक्षा घेतल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news