नांदेड : मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेफ करणाऱ्या ३९ जणांना अटक | पुढारी

नांदेड : मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेफ करणाऱ्या ३९ जणांना अटक

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : कुष्णुर (ता.नायगाव) येथे मराठा आंदोलनाप्रसंगी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी ३९ जणांना अटक केली होती. त्यांना आज बुधवारी (दि.१) न्यायालयासमोर उभे केले असता त्यातील ७ जणांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कृष्णूर येथे सोमवारी (दि.३०) रात्री अचानकपणे चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले होते. मंगळवारी (दि.३१) सकाळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर झाडे टाकून व टायर जाळून रस्ता बंद केला होता. त्यामुळे नांदेड – हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना जमावाने आचानकपणे पोलिसांवर दगडफेक सुरु केली. दगडफेकीत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पोलीसांनी बळाचा वापर करुन जमाव पांगविला. याप्रकरणी सपोनी विशाल बहात्तरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुंटूर पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी ३९ जणांना अटक केली होती. आज (दि.१) सायंकाळी त्यांना नायगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यातील सात जणांची जामीनावर सुटका करण्यात आली. तर ३२ जणांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.मुधोळकर तर आरोपीतर्फे अॅड.लंगडापुरे, इंगोले,जाधव, पाटील, देशपांडे, आदी वकीलांनी काम पाहिले.

हेही वाचा : 

Back to top button