मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सिल्लोडमध्ये सरकारची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा | पुढारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सिल्लोडमध्ये सरकारची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या जनआंदोलनाला पाठिंबा म्हणून साखळी उपोषण, आमरण उपोषण तसेच धरणे, निदर्शने, नेत्यांना गावबंदी, लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवून रोष व्यक्त करणे अशी विविध आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहेत. बुधवारी (दि. १) ग्रामीण भागातून तहसिल कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सरकारच्या प्रतिकात्मक तिरडीची अंत्ययात्रा काढण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या जनआंदोलन चळवळीत परिवर्तित झाले असून गावागावात विविध प्रकारचे आंदोलन मराठा समाजाच्या वतीने केले जात आहेत. बुधवारी (दि. १) सिल्लोड तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या तिरडी अंत्ययात्रा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या अंत्ययात्रेत तालुक्यातील मोठ्यासंख्येने गर्दी झालेली पहायला मिळाली. आंदोलकांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून तहसिल कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

सिल्लोड तालुक्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीने (दि. १) बुधवार रोजी सरकारची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा आंदोलन काढण्यात आली होती. सरकारच्या या प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रेची सुरवात सकाळी ७ :३० वाजता तालुक्यातील पानवडोद येथून सुरुवात होऊन गोळेगाव, लिहाखेडी फाटा, पालोद, १२ नंबर फाटा, अन्वी फाटा, मंगरूळ फाटा, डोंगरगाव फाटा या मार्गाने मुख्य रस्त्याने सरकारची तिरडी अंत्ययात्रेने शहरात प्रवेश केला. सरकारच्या तिरडी अंत्ययात्रेत मार्गावरील गावातील नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

शहरात अहिल्याबाई होळकर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून सरकारची प्रतिकात्मक तिरडी रचलेली अंत्ययात्रा
तहसील कार्यालय सिल्लोड येथे पोहचली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या सरकारच्या प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या सकल मराठा समाज बांधवांसह ईतर समाज बांधवांचे सिल्लोड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Back to top button