

११ एप्रिल २०१६ त्या दिवशी रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. त्यावेळी आपण ठरवलं की, आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय; पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये रूपांतर करायचं आहे.
Devendra Fadnavis on Ravindra Chavan statement
लातूर : "या भूमीने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले आहे. त्यातील एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुख यांचे आहे. हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही. दोन दिवसापूर्वी आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते. ते बोलत असताना त्यांना सांगायचं होतं की, राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे; पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे; पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी विलासराव देशमुख यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे," अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ७) लातूर येथील जाहीर सभेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विधानावर सारवासारव केली.
रविंद्र चव्हाण लातूरच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी गर्दीला उद्देशून म्हणाले की, "आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर लक्षात येतंय की शंभर टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील. यात काही शंका नाही."
लातूर ही अशी भूमी आहे की, या भूमीने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांनी नगराध्यक्षापासून लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत, तसेच महाराष्ट्रातील मंत्री ते देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूरला एक वेगळी ओळख दिली. तसेच माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचाही महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे, म्हणून ज्यांचा आपण आदर करतो. त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुख यांचं आहे. हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही. म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी सांगायचं होतं की, राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे; पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे; पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे.
मी कोणावर टीका करण्याकरिता या ठिकाणी आलो नाही; पण काही लोकांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर १०० दिवसांत पाणी देईन, नाहीतर राजीनामा देईन, असं म्हटलं होतं; त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
११ एप्रिल २०१६ त्या दिवशी रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय; पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये, या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे, असा निर्धारही फडणवीसांनी व्यक्त केला. जवळपास २५९ कोटी रुपयांची योजना लातूरकरिता आपण मंजूर केली आहे. या योजनेचं २२ टक्के कामही पूर्ण झालं आहे. धनेगाव धरणापासून हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाइपलाईन असेल, त्यातून आपण पाणीपुरवठा करणार आहोत. आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरातील घनकचरा आता लायबिलिटी नाहीये, ती आपली संपत्ती झाली आहे. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आता आपण खतांची निर्मिती करतो. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून कोळशासारखे पेलेट आपण तयार करतो, जे वीज निर्माण करणाऱ्या कंपनीला विकता येतात. आणि आता तर मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून आम्ही विद्युतनिर्मिती देखील सुरू केलेली आहे. त्यातून पैसा हा आज आपल्या या सगळ्या महानगरपालिकांना त्या ठिकाणी प्राप्त होतोय. याकरिता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळतो आहे. पुढील काळामध्ये लातूरला एक मॉडेल शहर म्हणून आपण तयार केलं पाहिजे. या ठिकाणचा जेवढा कचरा आहे, हा सगळा कचरा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे, असेही फडणवीसांनी सांगितले.