

Babasaheb Ambedkar Smarak Nilanga
निलंगा: निलंगा शहरातील अशोकनगर येथील गायरान जमीन सर्व्हे क्रमांक १७३ मधील २०० बाय १८० फूट जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नगर परिषदेकडे वर्ग करून तिची अधिकृत नोंद करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) जिल्हा उपाध्यक्ष अंकुश माणिक ढेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी (दि. १२) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अशोकनगरच्या पश्चिम बाजूस असलेली सर्व्हे क्रमांक १७३ मधील खुली गायरान जमीन गेल्या ६० ते ७० वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या वापरात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या जागेवर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे या जागेची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह’ म्हणून अधिकृत नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर जागेची नोंद सर्व्हे क्रमांक १७३ च्या ७/१२ उताऱ्यावर तसेच नगर परिषदेच्या ८-अ उताऱ्यात आणि मालमत्ता रजिस्टरमध्ये करण्यात यावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात निलंगा नगर परिषदेकडे यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आल्याचे अंकुश ढेरे यांनी सांगितले.
मात्र, वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाकडून या प्रश्नाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आंबेडकरी विचारांच्या जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जागेची अधिकृत नोंद करून ती सांस्कृतिक सभागृहासाठी नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या उपोषणात अंकुश ढेरे, रजनीकांत कांबळे, दम्मानंद काळे, रोहित बनसोडे, विलास सूर्यवंशी, डिगंबर सूर्यवंशी, नय्युम खतीब, भगवान कांबळे, रामलिंग पटसाळगे, बंटी कांबळे, धनराज कांबळे, किरण कांबळे, अभय ढेरे, देविदास धैर्य, निलेश गायकवाड यांच्यासह अशोकनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर आणि शहरातील आंबेडकरी विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.