Latur crop damage : सौर प्रकल्पातील तणनाशकाच्या फवारणीने २१ शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त

खंडाळी परिसरातील सोयाबीन-कापसाचे मोठे नुकसान; पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Latur crop damage
Latur crop damagepudhari photo
Published on
Updated on

अहमदपूर : पेरणीनंतर पावसाने महिनाभर उघडीप दिल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मागील आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मोठा दिलासा मिळाला होता. पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतात सोयाबीन व कापसाची पिके डोलू लागली होती. मात्र, खंडाळी परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पात सौर प्लेट धुण्याच्या मशीनद्वारे तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याचा आरोप असून, या फवारणीमुळे परिसरातील तब्बल २१ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

खंडाळी परिसरात शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ५ जुलै २०२६ रोजी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांकडून सौरऊर्जेच्या प्लेट धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमधून ‘२ फोर्टी’ तणनाशकाची फवारणी झाल्याने प्रकल्पालगतच्या शेतातील सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर त्याचा परिणाम झाला. काही दिवसांतच पिके माना टाकून सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latur crop damage
lemon leaf kadha : लिंबाच्या पानांचा काढा ठरू शकतो फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

पावसाने दिलेल्या उघडीनंतर मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांची मशागत केली होती. खर्च करून पेरणी, खते, औषधे व मजुरीचा भार सहन केल्यानंतर पीक चांगले बहरले होते. मात्र, फवारणीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अहमदपूर तहसीलदारांकडे निवेदन देऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला असून, १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Latur crop damage
NEET protest debate Parliament : अमित शहा चर्चेसाठी तयार; राहुल गांधी म्‍हणाले, "त्‍यांच्‍या उपदेश ऐकण्‍यात रस नाही"

या शेतकऱ्यांचे नुकसान

नुकसानग्रस्तांमध्ये नंदकुमार व्यंकटराव कांबळे – कापूस ३ बॅग, व्यंकटी बाबुराव कांबळे – कापूस ५ बॅग, विश्वनाथ तुकाराम पौळ – कापूस ६ बॅग व सोयाबीन २ बॅग, मंदोदरी वामनराव पौळ – कापूस ९ बॅग, हनुमंत पंचकराव पौळ – १ बॅग, बाबासाहेब बलभीम कांबळे – कापूस ३ बॅग, व्यंकट बापूराव कांबळे – कापूस ७ बॅग, बलभीम अप्पाराव कांबळे – कापूस ५ बॅग, गयाबाई विलास पौळ – कापूस ४ बॅग, तुकाराम विलास पौळ – मूग १ बॅग व सोयाबीन २ बॅग, माधव राजाराम पौळ – कापूस २ बॅग, सोयाबीन व मूग अर्धा एकर, दिलीप आप्पाराव कांबळे – कापूस १० बॅग, सुभाष बाबाराव पौळ – कापूस ५ बॅग, उद्धव बाबाराव दाभाडे – सोयाबीन ४ बॅग व कापूस ३ बॅग यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि दोषी आढळणाऱ्या संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news