

लातूर : शेतकऱ्यांच्या शेतातील अल्युमिनिअम व कॉपरच्या विद्युत तारा चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध लातूर पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. टोळीप्रमुखासह चौघांना संपूर्ण लातूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी ३१ जुलै २०२६ रोजी हद्दपारीचा आदेश पारित केला. त्यानुसार रमेश गोविंद शेनुरे, दत्ता गोविंद शेनुरे, अशोक रामचंद्र मुकुटमोरे आणि अशोक चंदर मुकुटमोरे यांना लातूर जिल्ह्याबाहेर करण्यात आले.
या टोळीविरुद्ध चाकूर, लातूर ग्रामीण, किनगाव आणि उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यांत अल्युमिनिअम व कॉपरच्या विद्युत तारा चोरीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे न्यायप्रविष्ट असून, वारंवार गुन्हे दाखल होऊन तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नसल्याचे पोलिसांच्या अभिलेखातून समोर आले.
हद्दपारीच्या प्रस्तावाच्या चौकशीदरम्यान गोपनीय साक्षीदारांनी टोळीच्या दहशतीबाबतही माहिती दिली. पोलिसांना माहिती देणाऱ्या तसेच त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना विरोध करणाऱ्या व्यक्तींना धमक्या दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
हद्दपारीपूर्वी संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची तसेच बचावाचे दस्तऐवज व साक्षीदार सादर करण्याची संधी देण्यात आली. प्राथमिक चौकशी, गुन्हेगारी अभिलेख, यापूर्वीची प्रतिबंधात्मक कारवाई आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून हद्दपारीचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
९ ऑगस्ट रोजी चाकूर पोलिस ठाण्यात पंचांच्या उपस्थितीत चौघांना हद्दपार नोटीस बजावून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले. हद्दपार कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना लातूर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.