

लातूर: जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. रेणा आणि मांजरा प्रकल्पांची दारे उघडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
तावरजा आणि आलमला नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तावरजा नदीवरील धानोरा आणि अहमदपूर तालुक्यातील हागदळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. उदगीर तालुक्यातील नेत्रगावच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे.
औसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख आणि ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये औसा-आलमला, आलमला-लातूर, गाडवेवाडी-नागरसोगा, आणि तपसे चिंचोली-औसा यांसारख्या मार्गांचा समावेश आहे.
कनिष्ठ अभियंता नागेश स्वामी आणि प्रशांत शेटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 'नदीकाठच्या आणि ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नये, तसेच रात्रीचा प्रवास टाळावा,' असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.