

Heavy rains cause decrease in ST revenue: Traffic on Beed, Dharashiv
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : बीड, धाराशिव, लातूर परिसरात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. सिडको बसस्थानकातून बीड, धाराशिव, लातूर मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची वाणवा जाणवत असल्याने बसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यात सर्वपित्री आमावसेचाही परिणाम झाल्याची माहिती आगार प्रमुख नीलिमा इसे यांनी दिली.
मागच्या आठवड्यासह या आठवड्यातही बीड, धाराशिव, लातूर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे या भागातील नदी-नाले दुधडी भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात एसटीचे विविध ठिकाणी प्रवास करणार प्रवासी घराबाहेर निघण्यास तयार नसल्याने याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. अतिवृष्टीबरोबरच सर्वपित्री आमावस्याचाही परिणाम प्रवाशांच्या विविध ठिकाणी जाण्या-येण्यावर झाला असल्याचीही माहिती इसे यांनी दिली.
गतवर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान वरील मार्गावर सुमारे १६ हजार ७२५ प्रवाशांची विविध मार्गांवर प्रवास केला होता. या वर्षी सर्वपित्री आमावस्या तसेच त्या भागातील सतत अतिवृष्टी होत असल्याने १ ते २० सप्टेंबरदरम्यान १३ हजार ३९२ प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजे ३ हजार ३३३ प्रवाशांची घट झाली आहे. प्रवासी घटल्याने उत्पन्नातही घट झाली आहे.
एसटी महामंडळाची सेवा सर्वच मार्गावर आहे. अतिवृष्टीमुळे बीड, धाराशिव, लातूर मार्गावरील प्रवासी संख्या घटली. सर्वपित्री आमावस्यामुळे इतर मार्गावरीलही प्रवासी संख्या काही प्रमाणात घटली होती, परंतु अतिवृष्टीमुळे प्रवासी संख्या घटली नसल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले.