

The death of veteran actor Nana Patekar in Jalna district has been mourned
जालना, पुढारी वृत्तसेवाः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने जालना जिल्ह्यावर शोककळा पसरली. नानानी अभिनयासोबतच सामाजिक कार्यातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, कोरोना, पाणीटंचाई आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने नामच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला.
जालना जिल्ह्यात २०१९ ते २१ दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना नामच्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थीक मदत करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यात जवळपास १ कोटी २५ लाख रुपयांची मदत नाम च्या माध्यमातून करण्यात आली. कोरोना काळातही गोर गरिबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे घरातील जवळचा माणूस गेल्याची भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यातील भोरडी नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला नाम फाउंडेशनने दिलेले सहकार्य माझ्या कायम स्मरणात राहील. या कामामुळे नदीपात्राची जलधारण क्षमता वाढली, मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. एकर शेती ओलिताखाली येण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.
नानांच्या सेवाकार्याची प्रेरणा कायम : भाऊसाहेब घुगे
ज्येष्ठ अभिनेते, समाजसेवक आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दुष्काळग्रस्त व वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य करणारे नाना पाटेकर यांच्या निधनाने माणुसकीचा आधारवड हरपला आहे. नानांच्या जाण्याने केवळ कला आणि समाजसेवेच्या क्षेत्राचीच नव्हे, तर माझ्यासारख्या त्यांच्या सहवासातून समाजसेवेची प्रेरणा घेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाउसाहेब घुगे यांनी व्यक्त केली.