

Galhati project dry; 10 to 15 villages including Shahapur facing water crisis
शहापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सर्वात मोठा पाणी साठा असलेला प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा बारसवाडा, येथील गल्हाटी प्रकल्प ऑक्टोबर महिन्यातच पूर्णपणे कोरडा पडला आहे. यामुळे शहापूरसह परिसरातील सुमारे १० ते १५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये शेतीबरोबरच नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गल्हाटी प्रकल्प परिसराचे सध्याचे चित्र अत्यंत विदारक असून, मोठ्या प्रमाणात पसरलेले प्रकल्पाचे पात्र अक्षरशः कोरडे पडलेले दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
गल्हाटी प्रकल्पातील पाणी उपलब्ध नसल्याने परिसरातील शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी पावसाची प्रतीक्षा असतानाच प्रकल्प कोरडा पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने वेळेवर साथ न दिल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील पाण्याची पातळीही आहे. (छायाः अशोक गायकवाड) खालावत असल्याने भविष्यात शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहापूरसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. गल्हाटी प्रकल्प कोरडा पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गावोगावी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांवर आता मोठा ताण येत असून, पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, गल्हाटी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध विहिरी-बोअरवेलची पाहणी तसेच जनावरांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गल्हाटी प्रकल्पात पाणीसाठा नसल्याचे हे चित्र केवळ एका प्रकल्पाची स्थिती दर्शवत नसून, आगामी काळातील मोठ्या जलसंकटाची चाहूल देणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नियोजन करावे, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
गल्हाटी मध्यम प्रकल्प हा १९६६ पासून अस्तित्वात असलेला अंबड तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या लाभक्षेत्रातील अनेक गावे, तांडे व वस्त्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिक या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, प्रकल्पास आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेषतः सन १९८८ पासून स्थानिक शेतकरी सातत्याने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
गल्हाटी मध्यम प्रकल्पात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून गोदावरी नदी मधुन पाणी आणण्यासाठी गल्हाटी संघर्ष समिती मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे, यासाठी अनेक आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करण्यात आले आहेत परंतु प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेण्यात आला.
पाणी आणण्याचे केवळ आश्वासन
मागील वीस वर्षांपासून गोदावरी नदी येथून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून गल्हाटी धरणात पाणी आणण्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे, पाणी आणण्याचे आश्वासन फक्त निवडणूक होईपर्यंत शेतकऱ्यांना दिले जाते परंतु निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून याचा पाठ पुरावा केला जात नसल्याची चर्चा आहे.