

Protest in Vadigodri Circle demanding higher sugarcane prices
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला ३६०० रुपये प्रति टन दर मिळवण्यासाठी वडीगोद्री सर्कल जनजागृती करण्यात येत आहे. गावा-गावांत बैठक जनजागृती करण्यात येत असून लवकरच रास्ता रोको आंदोलना करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
वडीगोद्री सर्कलमधील साष्ट पिंपळगाव, चुर्मापुरी, टेंभी अंतरवाली, अंतरवाली सराटी, नालेवाडी इत्यादी ठिकाणी जनजागृती परिषद आयोजित करून शेतकऱ्यांना आगामी काळात वडीगोद्री येथे आयोजित होणाऱ्या ऊस दराच्या राजू शेट्टी यांच्या रास्ता रोको बद्दल माहिती दिली जात आहे. घुंगर्डे हादगाव येथील मारोती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत उसाला ३९०० रुपये अधिक १०० व २०० रुपये असे एकूण ४२०० रुपये प्रतिटन दर मिळत असल्याचा दाखला देत, स्थानिक शेतकऱ्यांना मिळणारा २९०० रुपयांचा दर अत्यंत कमी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
ऊसाला ३६०० रुपये प्रतिटन पहिली उचल मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांना संघटित करण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या घामाचा आणि कष्टाचा योग्य मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, अंबड तालुका अध्यक्ष राजेंद्र खटके, प्रकाश तात्या बोर्डे, दिलीप हातोटे, विठ्ठल गावडे, शिवाजी काळे, प्रा. सुदर्शन गावडे यांची उपस्थिती होती.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस पीक मोठ्या प्रमाणावर करपून गेले असून, ऊस उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामात ऊस उपलब्धतेचेही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्याने जाहीर केलेला २२०० रुपये प्रतिटन दर अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.