

Water finally released into the Jayakwadi left-bank canal for the Rabi season!
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट झाली असताना रब्बी हंगामासाठी पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ख्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह अन्य पिकांच्या पेरणीचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, कालव्याच्या सुरुवातीच्या भागाबरोबरच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका घनसावंगी तालुक्यातील शेतीला बसला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने कापूस, सोयाबीनसह अन्य खरीप पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पिकांनी अपेक्षित उत्पादन दिले नाही. एकीकडे पिकांवर केलेला खर्च वाढला, तर दुसरीकडे उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता रब्बी हंगामावर आहे.
कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनातून खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जफेड, पुढील हंगामाचा खर्च आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीच्या पाण्यामुळे ब्बी हंगामाला बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाण्याचे नियोजन महत्त्वाचे देण्याबाबत सहकार्य करावे : कालव्यात पाणी सोडल्याने दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक आहे. कालव्याच्या सुरुवातीच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यानंतर शेवटच्या टोकावरील शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी पाणी वितरणाचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. आवर्तनाचा कालावधी, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे.
पिकांच्या लागवडीला मिळेल चालना
अखेर कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पाण्यामुळे रब्बी पिकांसाठी जमिनीची मशागत आणि पेरणीचे नियोजन करता येणार आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांच्या लागवडीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर रब्बीचे उत्पादन चांगले मिळाले, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळू शकतो. आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर आहेत.