

Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 13वा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, प्रकृती बिघडल्यानंतर काल त्यांना सलाईन लावण्यात आले. अशा परिस्थितीतही मराठा आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना भावनिक आणि मिश्किल अंदाजात आपली भूमिका स्पष्ट केली.
“भाऊबीजेला बहिणीकडे जेवायला नक्की जाईन. साडी-चोळी घेऊन जाईन. मात्र सध्या आंदोलन सुरू असल्याने त्यांनी मला आत्ता जेवायला बोलावू नये. भाऊ संकटात पडेल असे बहिणीने करू नये,” असे जरांगे पाटील म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी चांगल्या भावनेतून निमंत्रण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणाचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “भावाचे नाते जोडले आहे, त्यामुळे भाऊबीजेला त्यांच्या घरी जेवायला नक्की जाऊ,” असे म्हणत जरांगे यांनी निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाचे पुढील स्वरूप आणि दिशा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार मराठा समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी मराठवाड्यात आतापर्यंत देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांची अद्ययावत आकडेवारीही त्यांनी जाहीर केली.