Bitter Gourd Price Crash Jalana: कडू कारल्याची कडू कहाणी; उत्पादन घटले, भावही कोसळले...!

एकरी ७० ते ८० हजारांचा खर्च; पाच-सात रुपये किलो दराने विक्रीची वेळ
Bitter Gourd Price Crash Jalana: कडू कारल्याची कडू कहाणी; उत्पादन घटले, भावही कोसळले...!
Published on
Updated on

सागर देशमुख

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसांगवी परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा कारल्याचा हंगाम चांगलाच कडू ठरला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्पादनातील घट, वाढता लागवड खर्च, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील घसरणीचा दुहेरी फटका बसला आहे. त्यामुळे एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कारले उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कारल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यासोबतच मिरची, टोमॅटो यांसारख्या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने पाण्याची मागणी वाढली. उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना कारल्याचे पीक वाचविण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली. परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

Bitter Gourd Price Crash Jalana: कडू कारल्याची कडू कहाणी; उत्पादन घटले, भावही कोसळले...!
Bitter gourd price rise : उन्हाळ्यात कारले, दोडके भावात वाढ

२० गुंठे कारल्यासाठी घेतले 40 ते 50 हजारांचे खर्च

पारध बु. येथील शेतकरी नारायण आल्हाट यांनी यंदा २० गुंठे क्षेत्रात कारल्याची लागवड केली. या लागवडीसाठी बियाणे, मल्चिंग, बांबू, तार, खते, औषध फवारणी, मजुरी तसेच पाण्यावर मोठा खर्च झाला. लागवडीसाठी त्यांना तब्बल 50 हजार रुपयांचे खर्च करावे लागले. मात्र, उत्पादन घटल्याने आणि बाजारभाव पाच-सात रुपये किलोवर आल्याने केलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न आल्हाट यांच्यासह कारले उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Bitter Gourd Price Crash Jalana: कडू कारल्याची कडू कहाणी; उत्पादन घटले, भावही कोसळले...!
Identify Bitter Cucumber | काकडी कडू आहे की नाही हे चाखल्याशिवाय कसे ओळखाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

वातावरणाच्या लहरीपणाचा पिकाला फटका

यंदा असंतुलित वातावरणाचा कारल्याच्या पिकावर मोठा परिणाम झाला. अपेक्षित वेळेत झाडांना कारले लागले नाहीत. त्यातच पिकावर विविध प्रकारचे विषाणूजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कारल्याचे प्लॉट लवकरच खराब झाले. त्यामुळे सुरुवातीपासूनच उत्पादनात मोठी घट झाली.

ज्या शेतकऱ्यांचे पीक काही प्रमाणात टिकून राहिले, त्यांना उत्पादन सुरू झाल्यानंतर बाजारभावाचा फटका बसला. सुरुवातीला कारल्याला बाजारात दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत भाव मिळत होता. मात्र, सर्व शेतकऱ्यांचे उत्पादन एकाच वेळी बाजारात दाखल होऊ लागल्याने आवक वाढली आणि कारल्याचे दर थेट पाच ते सात रुपये किलोपर्यंत घसरले.

Bitter Gourd Price Crash Jalana: कडू कारल्याची कडू कहाणी; उत्पादन घटले, भावही कोसळले...!
Bitter gourd : कारले खाताय सावधान ! खाण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की पाळा

खर्चाच्या तुलनेत उत्पन्नच नाही

कारल्याच्या लागवडीसाठी बियाणे, मल्चिंग, बांबू व तारांची उभारणी, खते, औषधांची फवारणी, मजुरी, पाणी आणि वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतो. यंदा हा खर्च एकरी ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र, बाजारात पाच-सात रुपये किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.

“एकीकडे उत्पादन खर्च वाढला, पाण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागले; दुसरीकडे रोगराईमुळे उत्पादन घटले आणि आता बाजारभावही कोसळला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काय उरणार?” असा सवाल कारले उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कडू कारल्यापेक्षा परिस्थितीची कडू चव अधिक

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट, वाढता खर्च आणि बाजारातील दराची घसरण या तिहेरी संकटामुळे यंदाचा कारल्याचा हंगाम शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरला आहे. मेहनत, भांडवल आणि पाणी खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ‘कडू कारल्याची कडू कहाणी’ परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करणारी ठरली आहे.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळावा, तसेच नैसर्गिक आपत्ती व रोगराईमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी कारले उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news