जरांगे रूग्णालयात दाखल; आज भूमिका जाहिर करणार | पुढारी

जरांगे रूग्णालयात दाखल; आज भूमिका जाहिर करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे यांना अखेर सोमवारी माघार घ्यावी लागली. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. गेले १७ दिवस त्यांचे उपोषण सुरू होते. बेमुदत उपोषणाऐवजी साखळी उपोषण करण्याची घोषणा करून ते तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आज पत्रकार परिषद घेऊन ते आंदोलनाची पुढील दिशा जाहिर करणार आहेत.

जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानाकडे रविवारी कूच केली होती. भांबेरी येथे ते थांबले होते. स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आंदोलकांनी त्यांना गावातच थांबवले होते. मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवू, पण तुम्ही उपोषण मागे घ्या, अशी त्यांची मागणी होती. सोमवारी सकाळी सागर बंगल्याकडे कूच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अंतरवालीत परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सकाळी दोन
भगिनींच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले.

पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले. काल फडणवीस यांनी भूमिका घेतली ती चुकीची होती. गृहखात्याचा चक्रव्यूह आम्ही भेदला. फडणवीस यांना राज्यात दंगल व्हावी असे वाटत होते. पण आम्ही ती होऊ दिली नाही. पोलिसांनी लाठीमार केला असता तर त्यावर प्रतिक्रिया उमटली असती आणि पूर्ण राज्य पेटले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. राज्य शांत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. पण ती मी पार पाडली. मी भांबेरीत मुक्काम केला. तेव्हा तेथे 25 हजार लोक होते. त्यात 5 हजार महिला होत्या, असे जरांगे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button